निलेश खरमरे, झी मीडिया, पंढरपूर : आषाढी वारीमध्ये आपण अनेक श्रद्धावान वारकऱ्यांची रूपं पाहतो कुणी टाळ मृदंग घेऊन, कुणी फुगडी खेळत, तर कुणी अभंग गात पंढरपूरकडे वाटचाल करताना दिसतो. पण असे काही अनोखे भक्त आहेत जे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
बापूराव गुंड हे पांडुरंगाचे असे भक्त आहेत जे पुण्यातून उलट्या पावलांनी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास १५० किलोमीटरचा प्रवास उलट्या पावलांनी पूर्ण केला आहे. हे केवळ अंधश्रद्धा नाही, तर यामागे आहे एक सशक्त सामाजिक संदेश देत बापूराव निघाले आहेत. समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडतात त्या विरोध करून चांगला संदेश देत आहेत. रोज १५-२० किलोमीटर असा प्रवास करत बापूराव आता पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांच्या या प्रवासात अनेक जण थबकतात, प्रश्न विचारतात, संवाद साधतात आणि हेच त्यांचं यश आहे.
वारीतले असे भाविक केवळ भक्तीच नव्हे तर समाजप्रबोधनाची मशाल घेऊन चालतात. बापूराव गुंड यांचा हा प्रवास त्यांच्या पावलांइतकाच आपल्याही मनावर ठसा उमटवणारा आहे. असाच एक युवा वारकरी सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. ज्याचं नाव आहे सूरज मगसुले.
कानडा राजा पंढरीचा... वेदांनाही नाही कळला अंतपार याचा... या ओळींचा अनुभव देणारा एक अनोखा वारकरी यंदाच्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी झाला आहे. सूरज तानाजी मगसुले असं या भक्ताचं नाव असून, तो थेट कर्नाटकातील हंचीनाकल या गावातून माऊलींच्या वारीसाठी महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
पांडुरंगावरील अपार श्रद्धेमुळे सूरजने केवळ वारीत सहभागी होण्यावर समाधान मानले नाही, तर तो सध्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे औपचारिक शिक्षणही घेत आहे. कीर्तन, अभंग, हरिपाठ या माध्यमातून अध्यात्माची गोडी आत्मसात करत तो इतरांनाही या भक्तीमार्गाकडे आकर्षित करत आहे. राज्याच्या सीमा ओलांडून पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या सूरजच्या भक्तीची वारकऱ्यांमध्ये चर्चा असून, त्याचे हे योगदान म्हणजे वारीच्या समरसतेचे आणि विठ्ठलभक्तीच्या सीमाहीन प्रेमाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.