Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा आज पहाटे संपन्न झाली. गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशी या दिवशीची विठ्ठलाची शासकीय पूजेचा मान हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा 6 जुलै 2025 आषाढी वारीची महापूजा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान हा नाशिकच्या उगले दाम्पत्याला मिळाला आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कैलास दामू उगले यांना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. त्यांचे वय 52 आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले यांना मिळाला आहे. दोघेही शेतकरी आहेत. उगले दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील जातेगाव ता. नांदगाव येथील रहिवासी आहेत. गेल्या 12 वर्षांपासून ते विठ्ठलाची वारी करत आहेत. कैलास उगले यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत.
मेळा भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी सोहळ्याची शासकीय पूजा करण्याचा मान हा राज्यातील मुख्मंत्र्यांना मिळत असतो. त्यासोबतच महिन्याभरापासून चालत पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्याला देखील हा मान दिला जातो. मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजा करण्याचा मान हा त्याचवेळी पदस्पर्श रांगेतील उभ्या असणाऱ्या भाविकांना दिला जातो. विठ्ठलाची महापूजा करणाऱ्या या वारकरी दाम्पत्याला पुढील वर्षभर एसटी महामंडळातर्फे मोफत प्रवास करण्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
यंदाची वारी ही विक्रमी होणार आहे. कारण मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतामधील कामे नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वारीमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे यंदा आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. काही दिवसांपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही राग आज गोपाळपूरच्या पुढं गेली असल्याचं म्हटलं जात आहे.
पदस्पर्श दर्शनासाठी मोठी गर्दी
आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूरच्या पुढे गेली आहे. दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या भाविकांवर आता पोलिसांची नजर असणार आहे. त्यासाठी पंढरपुरात मोठा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगेत प्रत्येक ठिकाणी भाविकांसाठी सर्व सोयी करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी मंदिर समितीनं वारकऱ्यांना मोफत चहा, पाण्याची सोय देखील केली आहे.