Shiv Jayanti Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांच्या हस्ते गडदेवता शिवाई देवीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थळ अशी पालखी मिरवणूक निघाली. शिवजन्म स्थळी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते.
'राजे अनेक होऊन गेलेत, अनेक संस्थानिक होऊन गेलेत, शिवाजी महाराजांसारखे कुणी नाही. शिव छत्रपती यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी नावं घेतात, मात्र छत्रपतीचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी फक्त जिजाऊचा वाटा आहे, काहीजण वेगळी नावं घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात,' असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनाच्या सरकारी जाहिरातीमध्ये इतर कुणाच्या फोटोची काय आवश्यकता? महाराजांना मुजरा करताना यांना इतर कुणाच्या फोटोची आवश्यकता का भासते? आमच्या महाराजांनी काय केलंय हे जगाला कुणी सांगायची गरज नाही. सरकारच्या जाहिरातीमधून महाराजांना मुजरा करण्याच्या नावाखाली केंद्रातील हुकूमशाला मुजरा करण्याचा हा अतिशय केविलवाणा प्रयत्न आहे," असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनाच्या सरकारी जाहिरातीमध्ये इतर कुणाच्या फोटोची काय आवश्यकता? महाराजांना मुजरा करताना यांना इतर कुणाच्या फोटोची आवश्यकता का भासते? आमच्या महाराजांनी काय केलंय हे जगाला कुणी सांगायची गरज नाही. सरकारच्या जाहिरातीमधून महाराजांना मुजरा करण्याच्या… pic.twitter.com/X8kB1NplBv
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 19, 2024
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
"शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष आहेत. अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवछत्रपती हे आधुनिक विद्वान होते. महाराजांचा सर्व समावेशक कारभार होता. त्यांनी प्रजेच्या सुखासाठी स्व:ताचे सुख पाहिले नाही. नौदलाच्या प्रतिमेवरती महारांची प्रतिमा हा आपला अभिमान आहे. उद्या विधानसभेत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होणार आहे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ," अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरीवर मोठी घोषणा केली.
"छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा करायला शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. जो पर्यंत सुर्य चंद्र आहे तो पर्यंत शिवाजी महाराजांचा जयजय कार होतच राहिल. आम्ही पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे रयतेचं राज्य मानतो. जनतेसाठी जे जे करता येईल ते करतो. तसेच लवकरच किल्ल्यांचे संवर्धन होईल," असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"शिवरायांचा विचार हा एकतेचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा विचार आहे. कुठल्याही परिस्थीतीत इथे निधी कमी पडू दिला जाणार नाही. मधल्या काळात निसर्ग चक्री वादळ झालं. हिरडा पिकाचं नुकसान झालं. त्याचे पंचनामे झाले. पण मदत मिळाली नाही. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की 15 कोटी रूपयांची मदत आहे ती करावी," असे अजित पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार IPS डॉ. दिलीप भुजबळ यांना देण्यात आला. तर शिवनेरी भूषण पुरस्कार ब्रिगिडीयर अनिल काकडे आणि डॉ. अरुण साबळे यांना देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अमरावतीत प्रहारच्या वतीने शिवभीम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत विविध गटातील तरुणांपासून ते जेष्ठ खेळाडु धावले आहे. आमदार बच्चू कडू यांनी या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. दरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेत विविध बक्षीसांची लायलू5होणार असून अमरावतीच्या शिवटेकडी पासून मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. आमदार बच्चू कडू यांनी मशाल हाती घेत शिवटेकड़ी वरील शिवरायांना अभिवादन केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या स्वराज्य यात्रेचा आज किल्ले रायगडावर समारोप होत आहे. त्यानिमित्ताने रायगडावरील राज दरबारात आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा करण्यात आली. राज सदरेवर शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. राज्यभरातून आलेल्या राष्ट्रवादी युवक पदाधिकारी यांनी जय भवानी जय शिवाजी , जय घोषात छत्रपती शिवाजी महाराज याना अभिवादन केले
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पोवाडा आणि मैदानी आखाडा प्रात्यक्षिके होतील. 12 फेब्रुवारी पासून युवक राष्ट्रवादीचा स्वराज्य सप्ताह सुरू झाला असून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज शिवजयंतीच्या दिवशी सांगता होत आहे.
Shiv Jayanti Live Updates : नागपुरात पहाटेपासून शिवजयंतीचा उत्साह
नागपूर नागपुरातही शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. महालस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवतीर्थ येथे पहाटेपासूनच शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार सोहळा सुरूय. पहाटे साडेपाचला पालखी सोहळा झाला. त्यानंतर महाराजांचा अभिषेक झाला. शिवस्वरुप वादन, आरती, शिवस्तुती व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेय. यावेळी हजारोच्या संख्येने तरुणाई शिवजन्मोत्सवात पहाटेपासूनच पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाली आहे.
आग्रा किल्यातील दिवाण-ए-आममध्ये आज शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी होण्याचं हे दुसरं वर्षं आहे. आग्रा किल्ल्यावर यानिमित्ताने लेजर शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती लावणार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.