Marathi News> ब्लॉग
Advertisement

...आणि पिंपरी भाजपचा 'एक'नाथ एकाकी पडला...!

...आणि या विचाराने तर तो आणखीच हवालदिल झाला!

...आणि पिंपरी भाजपचा 'एक'नाथ एकाकी पडला...!

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परगण्याच्या आर्थिक तिजोरीची चावी स्थायीच्या रुपात मिळत असतानाही शिलेदारांचा नेता होण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपच्या एक'नाथ'च्या मनात काहूर माजले होते...! भोसरीचे राजे राम अर्थात महेश आणि चिंचवडचे राजे लक्ष्मण या दोघांच्यामध्ये आपले सँडविच झाल्याचे शल्य त्याला बोचत होते...! सत्ता आली पण सत्तेची ऊब घेता आली नाही याची सल त्याच्या मनाला होती....! सभागृहाचा नेता पद घेतले पण हे पद म्हणजे शेळीच्या शेपटीसारखे अब्रू झाकता येत नाही आणि.....या विचाराने तर तो आणखीच हवालदिल झाला.....!

हा विचार करत असतानाच त्याला शहरात झालेल्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाची आठवण होऊ लागली...! पक्षाच्या अधिवेशनाला आयोजन चालू असताना राजे लक्ष्मण यांनी आपली पुरती बेअब्रू केलेली त्यांना आठवली...! मोठ्या सभा असो की कार्यक्रम वेळो वेळी आर्थिक कोंडी झाल्याचे आठवून एक'नाथ' कासावीस झाला...! राजे राम असो की लक्ष्मण दोघांच्यामध्ये आपल्याला काहीच स्थान मिळाले नाही हा विचार त्याला पुरता गलीतगात्र करत होता. 

आर्थिक तिजोऱ्या ज्यांच्या हातात होत्या त्यांनी अगदी पहिल्या वर्षांपासून कशी तोंडाला पाने पुसली हे आठवून तर त्याला संताप येऊ लागला...! भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आपणच कसे मुद्रित आणि चलचित्र बोरूबहाद्दरांना सामोरे जायचो हे ही त्याच्या डोळ्या समोरून तरळले...! कचरा प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना की आणखी इतर मोठे प्रकल्प आपण सगळ्यांना सामोरे गेलो पण मलिदा मात्र इतरांनी खाल्ला हा विचार या एक'नाथा'च्या मनात आला आणि त्याचा संयम सुटला...!

सभागृह, पक्षनेता झाल्यापासून मानमर्यादा तर सोडाच पण बहुतांश वेळा अपमान वाट्याला आलेला, हे पद घेतल्यामुळे महामंडळाच्या यादीतूनही कापलो गेलो, पण आता बास...! आता हा अन्याय नको...! कसले आले सभागृह नेते पद, कसले आले पक्षनेते पद, नको हे आपल्याला असा विचार त्याच्या मनात आला आणि तो तडक 'चंपा'कडे गेला आणि या पदातून मुक्त करा अशी आर्जव केली आणि सत्ता आल्यानंतर त्याचा उपभोग घेता येईल असा विचार करणाऱ्या पण पदरी केवळ निराशा आलेल्या एक'नाथ' ची मुक्तता झाली...! 

आता त्याच्या जागी त्याचाच विश्वासू असलेल्या 'नाम'देवाची निवड झालीय...!  आता एक'नाथ' एक सामान्य कार्यकर्ता...! पण लवकरच नाम'देवाला' ही हे पद म्हणजे केवळ शेळीची शेपटी आहे. अब्रू झाकता येत नाही....अशीच त्याची अवस्था होईल हा विचार एक'नाथाच्या मनात आला. पद सोडल्यानंतर आपल्या आजू-बाजूला कोणी नाही हेही त्याच्या लक्षात आले. आपण एकाकी आहोत याची जाणीव होताच जगदंब जगदंब म्हणत त्याने पालिकरूपी साम्राज्यातून पाय काढला...!

Read More