Marathi News> ब्लॉग
Advertisement

ओडिशात प्रस्थापित बिजू जनता दलास विरोध पण सत्तांतर कठीण

बिजू जनता दलाचे नवीन पटनायक हे १९ वर्षांपासून मुख्यमंत्रिपदावर आहेत. 

ओडिशात प्रस्थापित बिजू जनता दलास विरोध पण सत्तांतर कठीण

विनोद पाटील, झी मीडिया, मुंबई : ओडिशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रच होत आहेत. त्यामुळे ओडिशात लोकसभेतील भाजपाच्या कामगिरीसह नवीन पटनायक यांच्या दोन दशकांची सत्ता संपुष्टात येणार का ? याकडेही देशाचं लक्ष लागले आहे. बिजू जनता दलाचे नवीन पटनायक हे १९ वर्षांपासून मुख्यमंत्रिपदावर आहेत. गेल्या चार निवडणुकांमध्ये विधानसभा आणि लोकसभेतही त्यांच्या जागा घटण्याऐवजी वाढलेल्याच आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर हे लक्षात येतं.

fallbacks

२००४ मध्ये बिजू जनता दल आणि भाजपाची युती होती. त्यावेळी नवीन पटनायक यांना विधानसभेत ६१ तर भाजपाला ३२ जागा मिळाल्या. काँग्रेसला ३८ जागा जिंकता आल्या होत्या. २००९ मध्ये बीजू जनता दलानं १०३ जागा जिंकल्या तर काँग्रेसनं २७ जागा पटकावल्या. भाजपाला केवळ ६ जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसभेत बीजेडीला १४ तर काँग्रेसनं ६ आणि डाव्यांना एक जागा मिळाली. विशेष म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत मोदींची लाट असूनही लोकसभेत बीजेडीनं २१ पैकी २० जागा जिंकल्या आणि विधानसभेत १४७ पैकी ११७  जागा जिंकल्या. तर काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आणि  भाजपानं १० जागा राखल्या. मात्र यंदा शंखनाद थोडा कमी होण्याची शक्यता आहे. नवीन पटनायक सत्ता राखण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता असली तरी त्यांच्या जागा मात्र कमी होण्याची चिन्हं आहेत.

खाऱ्या पाण्यात कमळ फुलणार ?

देशात २०१४ मध्ये मोदी लाटेचा भाजपाला फायदा झाला. मात्र समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या राज्यात ही लाट आलीच नाही. भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं. मात्र यंदा भाजपानं इतर राज्यांमध्ये होणारं अपेक्षित नुकसान भरून काढण्यासाठी ओडिशावर लक्ष केंद्रीत केलंय. मोदी आणि अमित शाहांनी मोठ्या संख्येनं ओडिशात सभांचा धडाका लावला. याचा फायदा समुद्र किनारपट्टीच्या भागात भाजपाला होईल असं इथं फिरल्यानंतर आणि लोकांशी बोलल्यानंतर जाणवतं. किनारपट्टी भागात जवळपास दहा लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांपैकी काही ठिकाणी भाजपा वरचढ ठरू शकतो. विधानसभेतही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

ओडिशात 'नमो' नारा

दोन दशकांपासून बीजेडी सत्तेवर असली तरी नवीन पटनायकांविरोधात हवी तेवढी नाराजी मतदारांमध्ये दिसत नाही. जगतसिंगपूर लोकसभा मतदारसंघातले ७३ वर्षीय रथ ओझा म्हणतात "की ओडिशात गेल्या २० वर्षांत चांगला विकास झालाय. त्यामुळे राज्यात नवीनच हवेत आणि केंद्रात मोदी. कारण त्यांनी थोडीफार कामं केल्याचं दिसतं." त्यामुळे राज्यात नवीन आणि केंद्रात मोदी असा 'नमो'चा नवा नारा ओडिशात दिसतो.

काँग्रेसची पिछेहाट

ओडिशात प्रमुख लढत ही बीजेडी आणि भाजपात म्हणजे नवीन पटनायक आणि मोदींमध्येच दिसत आहे. काँग्रेसमध्ये कमालीची मरगळ असून संघटनेच्या पातळीवर काँग्रेस खिळखिळी झाल्याचं चित्र आहे. निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये ना गांधी घराण्याचं कुणी फिरकलं, ना दिग्गज नेत्यांनी सभा, रॅली घेतली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर थेट चौथ्या टप्प्यात तेदेखील राज्यातले सर्वात श्रीमंत उमेदवार असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक आणि त्यांच्या मुलासाठी राहुल गांधींनी एकमेव सभा घेतली. विधानसभेत काँग्रेसच्या गेल्यावेळच्या तुलनेत काही जागा वाढण्याची शक्यता असली तरी लोकसभेत काँग्रेसपुढे भोपळा फोडण्याचं आव्हान आहे. त्यामुळे ओडिशात नवं नव्हे तर 'नवीन'च सरकार राहण्याची दाट शक्यता आहे.

Read More