Dhanashree Verma Breaks Silence On Divorce: भारतीय फिरकीपटू आणि सध्या पंजाब किंग्जच्या संघातून खेळत असलेल्या युजवेंद्र चहलची पूर्वाश्रमीची पत्नी तसेच डान्सर धनश्री वर्माने आपल्या घटस्फोटासंदर्भात एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. घटस्फोटानंतर आपण एक पूर्णपणे बदलेली व्यक्ती आहोत, असं धनश्रीने म्हटलं आहे. मी सध्या सगळ्याच बाबतीत स्वत:ला प्राधान्य देत आहे. घटस्फोटानंतर माझ्यासंदर्भात सगळीकडे फार नकारात्मक बोलण्यात आलं. मात्र याकडे मी दुर्लक्ष करत असून याऐवजी मी इतरांसाठी प्रेरणादायी कशी ठरु शकते याचा प्रयत्न करतेय, असं धनश्रीने स्पष्ट केलं आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांचं 2020 मध्ये लग्न झालं होतं. मात्र त्यांचा संसार अवघ्या पाच वर्षच टिकला. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या अफवा व्हायरल होत असतानाच दोघांनी याच वर्षी मार्च महिन्यामध्ये खरोखरच घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला.
धनश्री आणि चहलच्या घटस्फोटानंतर सोशल नेटवर्किंगवर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. मात्र यासंदर्भात बोलताना धनश्रीने, "ट्रोलिंगला मी अजिबात घाबरत नाही कारण मी स्वतःला एका सकारात्मक शक्तीने व्यापून घेतलं आहे," असं उत्तर दिलं. "नकारात्मकता आणि सार्वजनिक पद्धतीने केली जाणारी टीका मला कधीच त्रासदायक वाटत नाही," असं धनश्री म्हणाली. "स्वत:वर प्रेम करणं, मनसिक शक्ती, शिस्त, व्यायाम, उत्तम आहार" हा आपल्या आयुष्याचा मूलमंत्र असल्याचं धनश्रीने म्हटलं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझा सन्मान करणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवण्यास माझं प्राधान्य असतं आणि मी घटस्फोटानंतर माझी जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे, असं धनश्री म्हणाली.
घटस्फोटानंतरच्या कठीण काळात मी माझ्या भावना माझ्या कलेच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. मी माझ्या भावना नृत्यात ओतत आहे, असंही धनश्रीने मुलाखतीत सांगितलं. "मला आशी अपेक्षा आहे की मी माझ्या वागण्यातून अधिक लोकांना प्रेरणा दिली आहे. स्वत: स्वत:चं रक्षक व्हावं आणि स्वत:ची ढाल स्वत: होण्यासाठी मी लोकांना प्रेरित केलं असावं," असंही धनश्री म्हणाली.
घटस्फोट आणि त्यानंतरच्या कालावधीबद्दल बोलताना धनश्रीने, "मी शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वावलंबनाचे महत्त्व. माझ्या पालकांनी माझ्या रुपात एका सक्षम स्री घडवली आहे. सध्याचा टप्पा हा विकासाचा आणि आत्म-शोधाचा टप्पा आहे," असं म्हटलं.
पैशांसाठीच धनश्रीने चहलबरोबर लग्न केलं होतं इथपासून ते धनश्रीने चहलची फसवणूक केली आहे अशा टीकाही या काळात झाल्या. धनश्रीला अनेक ट्रोलर्सने 'गोल्ड डिगर' म्हणजेच संपत्तीसाठी श्रीमंत व्यक्तीला फसवणारी असंही म्हटलं. या टीकेवरही धनश्रीने भाष्य केलं आहे. "मला लोकांमध्ये माझ्यासंदर्भात असलेल्या कोणत्याही गैरसमजांवर स्पष्टीकरण देण्यात रस नाही," असं धनश्रीने सर्व प्रकारच्या टीकांवर बोलण्यास नकार देताना म्हटलं आहे. "मी स्पष्टीकरण देत राहिल्यास त्यामुळे अधिक गोंधळ निर्माण होईल," असंही धनश्रीने म्हटलं आहे. "प्रेम हा जीवनाचा सर्वात सुंदर पैलू आहे," यावर आपला विश्वास असल्याचंही तिने आवर्जून नमूद केलं.
आयपीएलदरम्यान युजवेंद्र चहव आर.जे. महवशला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. महवशाने सोशल मीडिया आणि मुलाखतींमध्ये या कथित प्रेमप्रकरणांच्या अफवांबद्दल अस्पष्टपणे टिप्पण्या केल्यात. चहलने धनश्रीला 5 कोटी रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिल्याची आल्याची बातमी आल्यानंतर धनश्रीला ट्रोल करण्यात आलं. घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात गेलेल्या चहलने, 'Be your Sugar Dady'असा संदेश लिहिलेलं टी-शर्ट घातलं होतं. यातून त्याने धनश्रीला टोमणा मारल्याची चर्चा रंगलेली.