Bollywood Top Actress: बॉलिवूड इंडस्ट्रीमधील टॉप आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आपल्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. सप्टेंबर 2024 मध्ये तिने तिची मुलगी दुआ पदुकोण सिंगचे स्वागत केले. यानंतर तिने काही महिने इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा हळूहळू कामावर परतत आहे आणि लवकरच ती साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'AA22xA6' चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शन 'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शक अटली कुमार करत आहेत.
अशातच दीपिका पदुकोणबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना अभिमान वाटला आहे. दीपिकाने पुन्हा एकदा देशाला गौरव मिळवून दिला आहे. हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सने तिला 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम' मध्ये एक स्टार देण्याची घोषणा केली आहे. हा सन्मान तिला 2026 च्या 'मोशन पिक्चर्स' श्रेणीमध्ये देण्यात येईल. दीपिकाने तिच्या मेहनतीने जगभरात स्वतःचे नाव कमावले आहे.
2026 मध्ये मिळणार सन्मान
दीपिका पदुकोण ही केवळ एक भारतीय सुपरस्टार नाही तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणारी अभिनेत्री आहे. जगभरात तिचे चाहते आहेत. ही घोषणा लाईव्ह स्ट्रीमद्वारे करण्यात आली आहे. ज्यामुळे हा क्षण आणखी खास झाला. दीपिका हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे. तिच्यासोबत या खास यादीत एमिली ब्लंट, टिमोथी शालामे, रामी मालेक, रैचेल मॅकअॅडम्स, स्टॅनली टुच्ची आणि डेमी मूर अशी हॉलिवूडमधील अनेक मोठी नावे आहेत.
जागतिक स्तरावर भारताला मिळणार गौरव
अशा प्रसिद्ध कलाकारांमध्ये दीपिकाचे नाव समाविष्ट होणे ही एक भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दीपिकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. अनेक परदेशी कलाकारांना हा स्टार मिळाला आहे. परंतु दीपिका ही कामगिरी मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री आहे. हा सन्मान दर्शवितो की भारत आता केवळ मनोरंजन नाही तर जागतिक स्तरावर देखील दमदार कामगिरी करत आहे.
दीपिका पदुकोण ही चित्रपटासोबत तिच्या फॅशनमुळे देखील जगभरात प्रसिद्ध आहे. दीपिका ही लुई विटॉ आणि कार्टियर सारख्या लग्झरी ब्रँडची ब्रांड एम्बेसडर आहे. दीपिका पदुकोण ही बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच देशातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.