Marathi Actor Helped Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून 'सितारे जमिन पर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आमिर सतत मुलाखती देताना दिसतोय. नुकतीच आमिरनं एक मुलाखत दिली आणि यावेळी त्यानं खुलासा केला की 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू यांच्याकडे त्यानं मदत मागितली होती आणि त्यांनी एकही प्रश्न न विचारता त्याला कशी मदत केली याविषयी सांगितलं आहे.
आमिर खाननं ही मुलाखत 'द लल्लंनटॉप'ला दिली होती. या मुलाखतीत आमिरनं सांगितलं की जेव्हा तो शाळेत होता तेव्हा त्याच्या एका मित्राला एक शॉर्ट फिल्म करायची होती. त्यावेळी आमिर हा स्वत: त्यात एक अभिनेता, प्रोडक्शन मॅनेजर आणि स्पॉट बॉय अशी सगळी काम पाहणारा होता. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी आमिर खाननं या शॉर्ट फिल्मसाठी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्याकडे पैशांची मदत घेतली. त्यानंतर त्यानं कसे सगळे इक्विप्टमेन्टस गोळा केले याविषयी सांगितलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाविषयी सांगत आमिर खान एक किस्सा सांगत म्हणाला, 'दहावी झाल्यानंतर मी चित्रपटसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला. माझ्या वर्गात आदित्य भट्टाचार्य होता हा दिग्दर्शक बासु भट्टाचार्य यांचा मुलगा. तो एक शॉर्ट फिल्म बनवणार होता. त्यानं त्यासाठी मला विचारलं आणि मी होकार दिला. या शॉर्ट फिल्मसाठी मी अभिनेता, स्पॉट बॉय, फायनान्स मॅनेजर अशी सगळी काम पाहणार होतो. तो जी शॉर्ट फिल्म बनवणार होता त्याचं नाव पॅरेनॉया असं होतं. आता शॉर्ट फिल्म बनवायचं ठरलं पण त्यासाठी पैसे लागणार ते आमच्याकडे नव्हते. त्यावेळी मला आदित्यनं सांगितलं की याच बिल्डिंगमध्ये डॉ. श्रीराम लागू राहतात. तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि पैसे मागून बघूया.'
हेही वाचा : एखाद्या CEO इतका पगार घेतात बॉलिवूड सेलिब्रिटींचे बॉडीगार्ड
पुढे डॉ. श्रीराम लागू यांनी कशी मदत केली याविषयी सांगत आमिर पुढे म्हणाला, 'त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो. तेव्हा आम्ही फक्त 14-15 वर्षांचे होतो. आम्हाला पाहताच डॉ. लागू यांनी प्रश्न विचारला घरी येण्याचं काय कारण आहे? त्यावर उत्तर देत आम्ही सांगितलं की आम्ही एक चित्रपट बनवतोय आणि त्यासाठी आम्हाला पैसे हवे आहेत. त्यांनी कोणता आहे काय आहे काही न विचारता किती इतकं विचारलं? आम्ही लगेच सांगितलं 10 हजार. ते त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी 10 हजार रुपये आम्हाला आणून दिले. ते म्हणाले हे घ्या आणि बनवा चित्रपट. ही 1980-81 ची गोष्ट आहे. त्याकाळात दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती. पण त्यांनी अगदी सहजपणे काहीही विचार न करता आम्हाला हे पैसे दिले. शाहरुख म्हणाला या शॉर्ट फिल्मच्या प्रकियेनं माझ्या आयुष्याला एक दिशा दिली. या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.'