Sitaare Zameen Par Screening: गेल्या काही दिवसांपासून आमिर 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तीन वर्षांनंतर तो या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्क्रीनिंगदरम्यान आमिर आणि गौरी एकत्र खूप सुंदर दिसत होते. आमिरने क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर गौरीने हलक्या हिरव्या आणि गोल्डन रंगाची साडी नेसली होती. आझाद गडद निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला.
या स्क्रिनिंगमध्ये आमिरची मुलगी इरा खानसुद्धा हजर होती. ती तिच्या पती नुपूर शिखरेसोबत आली होती. 'सितारे जमीन पर' हा 2007 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, यात आमिर एका बास्केटबॉल कोचची भूमिका साकारत आहे. जो स्वमग्न मुलांना बास्केटबॉल शिकवतो. हा चित्रपट स्पॅनिश सिनेमावर आधारित असून त्याचे नाव 'कॅम्पिओन्स' आहे.
या चित्रपटाद्वारे आरोष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. हा चित्रपट 20 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आमिरने मार्चमध्ये त्याच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरीची ओळख अधिकृतरीत्या माध्यमांसमोर करून दिली होती. त्यानंतर ते अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. याआधी आमिरचे लग्न रीना दत्ता आणि किरण रावसोबत झाले होते.
या खास स्क्रिनिंगमध्ये सलमान खाननेही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमिर आणि सलमानची मैत्री बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. चित्रपट संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत सलमानने 'सितारे जमीन पर' बद्दल भरभरून स्तुती केली. सलमान म्हणाला की, आमिरने त्याला एक दिवस फोन करून सांगितलं की तो हा चित्रपट करतो आहे. त्यावर सलमानने त्याचं कौतुक केलं. गमतीने तो म्हणाला, 'तेव्हा आमिरकडे वेळच वेळ होता, त्यामुळे त्याने हा चमत्कार घडवला.' या संवादादरम्यान आमिर फक्त हसत राहिला.
सलमानने सांगितलं की त्यालाही हा चित्रपट करायचा होता, पण आमिरने पुढाकार घेतला आणि शेवटी चित्रपट स्वतः केला. दोघांमधील या गमतीदार संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.