Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ना मी तिचा बाप आहे, ना तिचा प्रियकर,' आमीर खान फातिमा शेखबद्दल स्पष्टच बोलला; 'इतके मूर्ख...'

आमीर खानने सांगितलं आहे की, ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपटात कोणीही फातिमा सना शेखची भूमिका साकारण्यास तयार नव्हतं. आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि इतर अभिनेत्रींनी ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता.   

'ना मी तिचा बाप आहे, ना तिचा प्रियकर,' आमीर खान फातिमा शेखबद्दल स्पष्टच बोलला; 'इतके मूर्ख...'

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानच्या नावे मागील 25 वर्षात फार मोजके फ्लॉप चित्रपट आहेत. यामध्ये ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपटाचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन आणि आमीर खान एकत्रित असल्याने या चित्रपटाची रिलीजआधी प्रचंड चर्चा होती. त्यामुळेच चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला 50 कोटींची ओपनिंग मिळाली होती. पण काही दिवसातच चाहत्यांनी चित्रपट नाकारला आणि बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. आमीर खाननेही अनेक मुलाखतींमध्ये ज्याप्रकारे चित्रपट तयार झाला होता त्याच्यावर आपण नाखूश होतो हे मान्य केलं आहे. तसंच आपण निर्माता यश चोप्रा आणि दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी रिलीजआधी त्यात काही बदल करण्यासाठी सुचवत होतो असाही खुलासा केला.

दरम्यान नव्या मुलाखतीत आमीर खानने दीपिका, आलिया, श्रद्धा यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्रींनी फातिमा सना शेखने साकारलेली भूमिका नाकारली होती असा खुलासा केला आहे. दंगल चित्रपटात फातिमाने आमीरच्या मुलीची भूमिका साकारल्याने दिग्दर्शकाच्या मनात थोडी शंका  होती. यामुळे त्याने चित्रपटातून आमचं रोमँटिक गाणं काढून टाकलं होतं असाही खुलासा आमीरने केला आहे.

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आमीर खानने सांगितलं की, आदित्य आणि विजय यांना फातिमाला झफिराच्या भूमिकेसाठी निवडताना समस्या जाणवत होती. "आम्ही जेव्हा कास्टिंग करत होतो तेव्हा कोणत्याही अभिनेत्रीने त्यासाठी होकार दिला नाही. दीपिका, आलिया, श्रद्धा सर्वांनी नकार दिला. अख्ख्या इंडस्ट्रीला ऑफर दिली, पण कोणालाही तो चित्रपट करायचा नव्हता," असं आमीरने सांगितलं. पटकथा चांगली नसल्याने नकार दिला होता का असं विचारलं असता त्याने हेच कारण असू शकतं असं म्हटलं. 

फातिमाने त्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं आणि त्यात फिट बसत होती म्हणून तिची निवड करण्यात आली. पण आम्ही दंगल चित्रपटात वडील-मुलीची भूमिका निभावली असल्याने तुमचा रोमँटिक ट्रॅक असणार नाही यावर ते ठाम होते. ती तुझी प्रेयसी कशी काय होऊ शकते? प्रेक्षक नाकारतील असं त्यांचं म्हणणं होतं असं आमीरने सांगितलं. 

"मी या सगळ्यावर विश्वास ठेवत नाही. ना मी खऱ्या आयुष्यात तिचा बाप आहे, ना खऱ्या आयुष्यात मी तिचा बॉयफ्रेंड आहे. आम्ही एक चित्रपट बनवत आहोत," असं सांगताना आमीर खानने अमिताभ बच्चन आणि वहीदा रहमान यांनी आई आणि मुलाची भूमिका केली आहे आणि चित्रपटांमध्ये लव्हर्सची भूमिका देखील केली आहे याची आठवण करून दिली. "प्रेक्षक इतके मूर्ख नाहीत की त्यांना वाटेल की तो खरा बाप आहे. जर आपण असे म्हटले तर आपण आपल्या प्रेक्षकांना कमी लेखत आहोत," असं तो म्हणाला. 

याच मुलाखतीत आमीर खानने खुलासा केला की त्यांनी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची मूळ पटकथा कधीच तयार केली नाही कारण त्यात सतत बदल होत होते. चित्रपट बनल्यानंतर, आदित्य चोप्राचा त्याला फोन आला, त्याला सांगण्यात आलं की, "मी पहिला कट पाहिला आहे आणि तो एक उत्तम चित्रपट आहे. तुम्ही काय बनवलं आहे याची तुम्हाला कल्पना नाही." आमीर म्हणाला की जेव्हा त्याने चित्रपट पाहिला तेव्हा त्याला धक्का बसला, कारण त्याला तो खूप वाईट वाटला. 

"मी त्यांना सांगितले की मला काहीच समजले नाही. सुरुवातीला त्यांना वाटलं की मी थट्टा करत आहे. मी त्यांना सांगितलं की हे एक दिवसही चालणार नाही," असं तो म्हणाला. आमीरने सांगितलं की, पुढचे 6-8 महिने चित्रपटावर चर्चा करत राहिले आणि तो दररोज त्यांच्याशी आपण सर्व चुकीचे बनललं आहे. हे संरचनात्मकदृष्ट्या चुकीचं आहे यावर भांडत होतो. 

आमीर खानने स्पष्ट केलं की, मूळ चित्रपटात अमिताभ बच्चन यांचं मध्यंतरादरम्यान मरणार होते. पण कथा बदलल्याने सगळं बदललं. "विजय आणि आदित्य दोघेही त्यावर सहमत होते आणि ते खूप आनंदी होते आणि त्यांना मी त्यात हस्तक्षेप करू नये असं त्यांना वाटत होतं, ते चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता आहेत आणि त्यांचाच निर्णय अंतिम आहे," असं तो म्हणाला. 

चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल विचारले असता, आमिर म्हणाला की त्याला ते अत्यंत दिशाभूल करणारं वाटलं. पण आदित्यला पायरेट्स ऑफ द कॅरिबियनसारखा चित्रपट बनवायचा होता, म्हणून त्याने तो चित्रपट बनवला असंही त्याने सांगितलं. 

Read More