बॉलिवूड अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) यांनी एका मुलाखतीत आपण मलमूत्र प्यायल्याची माहिती दिली होती. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता परेश रावल यांच्या आशिकी फेम अभिनेत्री अनु अग्रवालनेही आपण मलमूत्र पित असल्याची माहिती दिली आहे. ही योगामधील एक पद्धत आहे असा दावाही तिने केला आहे. मलमूत्र वृद्धत्वविरोधी आणि सुरकुत्यामुक्त ठेवण्यास मदत करतं असाही तिचा दावा आहे.
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत अनु अग्रवालने सांगितलं की, "बऱ्याच लोकांना हे माहित नाही. यामागे दुर्लक्ष किंवा जागरुकता नसणं हे कारणीभूत असू शकतं. पण मलमूत्र पिणं, ज्याला आमरोली म्हणतात, हे खरं तर योगातील एक मुद्रा (सराव) आहे. मी स्वतः ते केलं आहे. मी ते केलं असून, ही अतिशय महत्त्वाची पद्धत आहे".
पुढे तिने म्हटलं की, "पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणते संपूर्ण मूत्र पिऊ नका. त्याचा फक्त एक विशिष्ट भाग सेवन केला जातो. तो भाग अमृत मानला जातो. त्यात वृद्धत्वविरोधी गुण आहेत. तसंच तुमची त्वचा सुरकुत्यामुक्त राहते. हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर एकूणच फायदेशीर आहे. मी वैयक्तिकरित्या त्याचे फायदे अनुभवले आहेत."
या दाव्यामागे शास्त्रीय पुरावे नसल्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, "विज्ञान किती जुन आहे? 200 वर्षं...योगा 10 हजार वर्षांपासून आहे. तर मग तुम्ही कोणाचं ऐकणार? मी नक्कीच याला पाठिंबा देते".
परेश रावल यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगणचे वडील दिवंगत वीरु देवगण यांनी आपल्याला पायाची दुखापत बरी करण्यासाठी मलमूत्र पिण्याचा सल्ला दिला होता असा खुलासा केला होता. "मी नानावटी रुग्णालयात असताना वीरु देवगण तिथे कोणाला तरी भेटण्यासाठी आले होते. मीदेखील तिथे असल्याचं समजल्यानंतर भेटण्यास आले. मी त्यांना पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगितं. त्यांनी मला सकाळी उठवल्यानंतर मलमूत्र पिण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, सर्व फायटर पितात. फक्त सकाळी उठल्यानंतर आधी हे काम कर. तसंच मद्यपान, मटण, तंबाखू यांचं सेवन करु नको असंही सांगितलं. नियमित जेवण आणि मलमूत्र सेवन करत राहा असं ते म्हणाले. त्यानंतर माझा पाय एका महिन्यात बरा झाला".