Abhishek Bachchan on Wife Aishwarya Rai: अभिनेता अभिषेक बच्चन मागील काही काळापासून सातत्याने पत्नीबरोबरच्या कथित वादामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या रायबरोबर अभिषेकचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा मनोरंजनसृष्टीत रंगलेल्या असतानाच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने पत्नीबद्दल एक फारच रंजक विधान केलं आहे. अभिषेक बच्चन 'आय वॉण्ट टू टॉक'मधील भूमिकेसाठी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेला होता. त्यावेळी त्याला अभिनेता अर्जून कपूरने काही प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देतानाच अभिषेकने पत्नीसंदर्भात एक खुलासा केला आहे.
याच आठवड्यात झालेल्या रिल शोशा अवॉर्ड सोहळ्यामध्ये अभिषेक बच्चनला 'आय वॉण्ट टू टॉक'साठी सर्वोत्तकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर होस्ट अर्जून कपूरने अभिषेकला मस्करीत, "अशी कोणती व्यक्ती आहे जिने 'अभिषेक, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे,' असं म्हटल्यावर तू तणावात जातोस?" असा प्रश्न विचारला. प्रश्न ऐकल्यानंतर हसत हसतच अभिषेकने, "अजून तुझं लग्न झालेलं नाही ना... जेव्हा होईल तेव्हा तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर असेल," असं म्हटलं. त्यानंतर थेट पत्नी ऐश्वर्या रायचं नाव न घेता अभिषेकने, "जेव्हा तुम्हाला बायकोचा फोन येतो आणि ती 'मला तुझ्याशी बोलायचं आहे' असं म्हणते तेव्हा तुम्हाला ठाऊक असतं की तुम्ही अडचणीत आहात," असं उत्तर दिलं.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना 13 वर्षांची आराध्या नावाची मुलगी आहे. नुकत्याच 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिषेकने त्याचं मुलीसोबत नातं कसं आहे याबद्दल भाष्य केलं होतं. "तुम्ही पालक असताना तुम्हाला घरी राहायला मिळतं हे फारच छान असतं. तुम्ही प्रोफेश्नल असो किंवा सिलिब्रिटी असो तुम्ही घरी असताना पालक असता. मी याकडे रिअॅलिटी चेक म्हणून पाहत नाही मात्र घरातूनच प्रेम मिळतं आणि ते तुम्ही काय करता यावर अवलंबून नसतं," असं अभिषेक म्हणाला.
नक्की वाचा >> वयाने 31 वर्ष लहान हिरोईनबरोबर तू रोमान्स करणार? प्रश्न ऐकताच सलमान खान म्हणाला, 'तिच्या मुलीबरोबर...'
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बी हॅपी'मधील भूमिकेसाठी अभिषेकवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. वडील आणि मुलीच्या नातेसंबंधांवर आधारित या चित्रपटामध्ये इनायक वर्मा, नोरा फतेही आणि नास्सर यांचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट सध्या प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.