Entertainment News : आजवर बरीच कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्यासोबतच त्यांच्या जीवनातील काही आव्हानात्मक प्रसंगांविषयीसुद्धा बोलताना दिसली. यातच आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं असून, त्यानं कैक वर्षांपूर्वी त्याच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाला वाचा फोडली.
वयाच्या 14 व्या वर्षी घडलेल्या एका अतिशय अनपेक्षित प्रसंगानं, व्यक्तीनं आणि त्याच्या कृत्यानं या अभिनेत्याला इतका वाईट अनुभव आला की, तेव्हापासून त्यानं मुंबई लोकलनं प्रवास करणंही सोडलं. किंबहुना त्या क्षणापासून पुरुषांविषयीच त्याच्या मनात एक प्रकारची भीती बसली. पण, ओघाओघानं समलैंगिक पुरुष आणि तत्सम संकल्पनांच्या बाबतीत त्यांची मतं बदलून सर्वांनाच एकाच दृष्टीकोनातून पाहणं शक्य नसल्याची बाब त्यानं मुलाखतीदरम्यान स्पष्ट केली.
Hauterrfly सोबत संवाद साधताना अनेक गोष्टींविषयी मोकळेपणानं बोलणारा हा अभिनेता म्हणजे आमिर अली. जेव्हा आमिरला त्याच्या 'गे' अर्थात समलैंगिक मित्रांविषयी विचारण्यात आलं तेव्हा सुरुवातीला आपल्या मनात काही न्यूनगंड होते असं त्यानं स्पष्ट सांगितलं.
'तुम्ही जेव्हा फार कमी वयाचे असता आणि मी तेव्हाच पहिल्यांदा रेल्वेनं प्रवास केला होता. पण, मी रेल्वेनं प्रवास करणं थांबवलं होतं आणि यामागे कारण होतं ते म्हणजे मला तिथं स्पर्श केला जात होता. मी फक्त 14 वर्षाचा होतो. मी तितक्यातच माझी बॅग माझ्या पाठीशी घट्ट पकडण्यास सुरुवात केली. पुन्हा एके दिवसी कोणीतरी माझी पुस्तकं चोरली.... आणि माझं असं झालं की कोण पुस्तकं का चोरेल? बस्स... तेव्हापासून मी ट्रेननं प्रवास केलाच नाही.'
पुढे कालांतरानं आमिर मोठा झाला आणि त्याच्याच काही मित्रांनी त्याला आपण समलैंगिक असल्याचं सांगितलं, जिथं त्याला आपण किती चुकीचे पूर्वग्रह बांधले हे त्याच्या लक्षात आलं. 'माझे काही मित्र होते, ज्यांनी त्यांच्या मनात पुरुषांविषयीच भावना असल्याचं सांगितलं आणि मी त्यांना खूप चांगलं ओळखतो. ते माझ्या भावंडांसारखे आहे. मी अगदी त्यांच्यासोबतच एक बेड शेअर करतो आणि जेव्हा त्यांनी त्यांची ही ओळख स्वीकारली तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोनचार वाईट अनुभवांमुळं मी पूर्ण जगच वाईट आहे असं ठरवू शकत नाही. कारण जेव्हा तुम्हाला समज येते तेव्हा तुमचे विचारही बदलतात', असं तो म्हणाला. आमिरनं त्याच्या खासगी जीवनाविषयी उघड केलेल्या या गोष्टींनी सर्वांचच लक्ष वेधलं.