Atul Kulkarni Visit Pahalgam : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत दु:खी आहे. या घटनेनंतर अनेक लोकांनी आपला राग आणि संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर अनेक जणांनी काश्मीरचे तिकिट आणि हॉटेल बुकिंग रद्द केलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लोक आता काश्मीरला जाणे टाळत आहेत.
अशा परिस्थितीत, लोकांची भीती दूर करण्यासाठी आणि काश्मीरचे सौंदर्य पुन्हा वाढवण्यासाठी मराठी प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. अतुल कुलकर्णी यांनी पर्यटकांना काश्मीरला जाण्याचे आवाहन केलं आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी यांनी पहलगाम येथील स्थळांना भेट देत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नेमकं काय म्हणाले अतुल कुलकर्णी?
पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर चलो कश्मीर असं आवाहन करत, स्वतः अभिनेता अतुल कुलकर्णी श्रीनगरमध्ये पोहोचले आहेत. हल्ल्यांद्वारे काश्मीरची अर्थव्यवस्था खिळखिळी करायची हा दहशतवाद्यांचा डाव आहे. काश्मीर आमचं आहे. त्यामुळे आम्ही येथे नेहमी येणार. त्यामुळे त्यांना एकच सांगायचं आहे की, तुम्ही येथे येऊ नका. जर यांना उत्तर देयचं असेल तर येथे पर्यटकांना यावं लागेल. भारतीय म्हणून दहशतवाद्यांचं हे कारस्थान आपल्याला हाणून पाडायचं आहे, असं आवाहन अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पहलगाम येथील विविध पर्यटन स्थळांना भेट देत आहेत. त्यासोबतच तिथे काढलेले फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच त्यांनी फोटो शेअर करताना पर्यटकांना आवाहन केलं आहे. तसेच अभिनेत्याने मुंबईहून श्रीनगरला जाणाऱ्या रिकाम्या विमानांचे फोटो शेअर केलेत. जे पूर्वी पूर्ण भरलेले असायचे. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर ते रिकामे पडले आहेत. त्यानंतर ते पुन्हा एकदा भरावे लागतील आणि दहशतवादाचा पराभव करायला लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.
अतुल कुलकर्णी यांनी पहलगाममध्ये राहणाऱ्या लोकांचीही भेट घेतली. त्यांना देखील घडलेल्या घटनेचे दु:ख आहे. त्यांना आशा आहे की लवकरच येथील रस्ते पुन्हा एकदा पर्यटकांनी भरलेले दिसतील. त्यासोबतच अतुल कुलकर्णी यांनी हल्ल्यानंतर काश्मीरच्या सुंदर दऱ्यांची झलकही दाखवली आहे. ज्यामध्ये त्यांच्या आजूबाजूला काही लोक दिसत आहेत. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये चला कश्मीरला जाऊ म्हणत पर्यटकांना आवाहन केलं आहे.