बॉलिवूडमधील दीर्घकाळ आणि सर्वात यशस्वी अभिनेत्याचा उल्लेख होतो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी अमिताभ बच्चन नाव येतं. मागील पाच दशकांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अमिताभ बच्चन यांचं नाव मनोरंजन क्षेत्रात फार आदराने घेतलं जातं. इतके मोठे अभिनेते असतानाही अमिताभ बच्चन आपल्या वक्तशीरपणा आणि नम्रतेसाठी ओळखले जातात. अनेक अभिनेत्यांनी अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगताना तोंडभरुन कौतुक केलं आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत, 'खुदा गवाह' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणारे ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी अमिताभ किती महान अभिनेते आहेत असं सांगितलं आहे. तसंच आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला कशाप्रकारे तोंड द्यायचे याबद्दल सांगितलं आहे.
Red FM Podcasts शी संवाद साधताना किरण यांनी सांगितलं की, "अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं म्हणजे व्हायरससह काम करण्यासारखं आहे. ते इतके महान अभिनेते आहेत आणि त्याची आवड इतकी जबरदस्त आहे की तो तुमच्या रक्तात मिसळतं. एकदा तुम्ही अमिताभ बच्चनसोबत काम केले की, त्यांच्या त्या व्यक्तिमत्वातून बाहेर पडणं खूप कठीण असतं, खासकरुन ते तुमच्याशी कसं वागतात ते प्रभाव पाडणारं असतं".
अमिताभ यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना किरण यांनी सांगितलं की, "काही कलाकार चित्रपटात खलनायक मारत असेल तर प्रतिक्रिया देत नाहीत, पण अमिताभ बच्चन त्यातील नाहीत. अमितजी मी दिलेल्या प्रत्येक मुक्क्याला प्रतिक्रिया देत असत. मी मारलेल्या प्रत्येक फटक्यानंतर ते 2 फूट मागे जात असत. ते खूप चांगले अभिनेते आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची चांगली माहिती आहे. तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करू शकता. पण अमितजींबद्दल मी एक गोष्ट शिकलो आहे ती म्हणजे जेव्हा त्यांना तुमच्याशी बोलायचे असतं तेव्हाच तुम्ही त्यांच्याशी बोलता."
यापूर्वी, अभिनेता कंवलजीत सिंग यांनी 'सत्ते पे सत्ता' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या आठवणी सांगितल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी कामाच्या पलीकडे जात त्यांच्या मुलाच्या कला प्रदर्शनाला उपस्थित राहिल्याची गोड आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणाले, "सत्ते पे सत्ता दरम्यान मी त्यांना खूप घाबरायचो. शूटिंगनंतर, ते आमच्या हॉटेलमध्ये येत असत. ते ओबेरॉयमध्ये राहत होते, तर आम्ही दुसरीकडे कुठेतरी राहत होतो. आम्ही स्नूकर खेळायचो. मी इतका घाबरायचो की जेव्हा जेव्हा मी चांगला शॉट घ्यायचो तेव्हा मी त्याच्याकडे पाहत असे आणि म्हणत असे, 'सॉरी.' हे पाहून ते म्हणायचा, 'का, यार? तो चांगला शॉट होता.' म्हणून मी म्हणायचो, 'ठीक आहे.' नंतर, जेव्हा माझा मुलगा, जो चित्रकार आहे, त्याचे प्रदर्शन होते, तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी विशेषतः त्याच्या सेक्रेटरीला सांगितले, 'कुकूसाठी एक तारीख शोधा, मला जायचे आहे.' आणि ते उद्घाटनासाठी आले. त्यांचं त्यांच्या कामावर प्रेम आहे".