Amruta Subhash Sexually Harassed: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा छाप सोडणारी आणि आता वेब सिरीज तसेच हिंदी चित्रपटांमधून देशभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री अमृता सुभाषने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक विचित्र खुलासा केला आहे. अमृताने मनोरंजनसृष्टीमध्ये लैंगिक छळ कसा केला जातो याबद्दल एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. अमृताने तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे ज्यावेळी तिने प्रभावशाली व्यक्तीला मर्यादा ओलांडण्यावरुन फैलावर घेतलं होतं. समोरची व्यक्ती कोणीही असली तरी अशा चुकीच्या वर्तुवणुकीविरुद्ध बोलणं का गरजेचं आहे याबद्दलही अमृताने या मुलाखतीत भाषण केलं आहे.
नाट्य क्षेत्रात काम करत असतानाचा अनुभव अमृताने मुलाखतीत सांगितला. "तो त्या नाटकाचा निर्माता होता. मी शिड्या चढत असतानाच कदाचित माझा स्कर्ट थोडा वर सरकला आणि मला ते समजलं नाही. मला कशाचा तरी स्पर्ध झाल्यासारखं वाटलं तर एक हात माझ्या कंबरेजवळ होता. मी मागे वळाले तर तो निर्माता मागेच होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "तुम्ही आता नक्की काय केलं? हा सारा काय प्रकार होता?" त्यावर त्याने अगदी काहीच न झाल्यासारखं भासवण्याचा प्रयत्न करत, "काहीच नाही" असं म्हटलं.
"मला जाणवलं. ते काय होतं?" असा प्रश्न मी विचारला. सर्वांनाच धक्का बसला कारण तो फार मोठा निर्माता होता. तो म्हणाला," नाही, नाही... तुझा टॉप वर सरकला." ते ऐकताच मी, "त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नसावं. तुम्ही मला स्पर्श करण्याची हिंमत कशी केली?" असा सवाल आपण केल्याचं अमृताने सांगितलं. "तुम्ही असं करु शकत नाही," असंही मी त्याला सांगितलं," असं अमृता 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
अमृताच्या आजूबाजूचे लोक याच्या परिणामाचा विचार करुन घाबरले. मात्र अमृता मागे सरली नाही. "त्यावेळी प्रत्येकजण म्हणत होता की, 'हिच्या हातून आता ही भूमिका जातेय.' त्यावर मी म्हणाले होते, 'खड्ड्यात गेलं ते!' तुम्ही माझ्या परवानगीशिवाय मला वाटेल तिथे स्पर्श करु शकत नाही. मी त्याला जशास तसं उत्तर दिलं. तो फार वयस्कर होता. मात्र असं असतानाही मी त्याला तिथेच आणि त्या क्षणी जाब विचारला," असं अमृताने सांगितलं.
मनोरंजन क्षेत्रात अशाच आव्हानांना तोंड देणाऱ्या तरुणींना अमृताने एक सल्ला दिला आहे. "मी एक गोष्ट कायम करते, ती म्हणजे थेट पुरुषांच्या डोळ्यात पाहते. असे पुरुष नजर मिळवण्यास घाबरतात. महिलांना माझी हिच टीप आहे. तुम्ही घाबरलात तर ते त्यांना कळतं आणि ते तुमच्यावर वरचढ व्हायचा प्रयत्न करतात. तुम्ही फक्त थेट त्यांच्याकडे पाहा. फक्त नजर फिरवा ते घाबरतात," असं अमृता म्हणाली.