Sexual Harassment In Entertainment Industry: अभिनेत्री अमृता सुभाष ही तिच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांमध्ये हटके आणि वेगळी कथानकं असलेल्या चित्रपटांची निवड करणारी अमृता मागील काही वर्षांपासून हिंदी चित्रपटांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकू लागली आहे. मात्र मनोरंजनसृष्टीमध्ये टिकून राहणं अत्यंत अवघड असल्याचं अमृताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमधून तिने सांगितलेल्या किस्स्यांमधून अधोरेखित झालं आहे. अमृताने तिच्यासोबत वडिलांच्या वयाच्या एका व्यक्तीने केलेल्या कृत्याबद्दल मुलाखतीत सांगितलं.
मनोरंजनसृष्टीमधील एका वरिष्ठ व्यक्तीने अमृताचा छळ करण्याचा प्रयत्न केला होता. ही व्यक्ती वारंवार अमृताला मद्यपान करण्यासंदर्भातील विचारणा करायची. "आज रात्री तू आमच्यासोबत ड्रिंक्ससाठी का येत नाहीस?" असं या व्यक्तीने अनेकदा अमृताला विचारलं होतं. अनेकदा विचारणा केल्यानंतर अमृता वारंवार नाही म्हणाल्यानंतरही ती व्यक्ती सतत आग्रह करत राहिल्याने अमृताने सर्वांसमोरच तिला सुनावलं.
"त्याचा रुम तिथेच होता. मी सरळ दार उघडून त्याच्या रुममध्ये शिरले. मला ठाऊक होतं की लोक मला पाहत आहेत. मी त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाले, "सर, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. तुम्ही माझ्याबरोबर असं का बोलत आहात? तुमचा प्रॉब्लेम काय आहे?" मी अगदी शांतपणे पण थेट डोळ्यात पाहत हा प्रश्न विचारला. त्याच्या नजरेत थोडा अवघडलेपणा दिसला. मी दार उघडंच ठेवलं होतं. अर्थात ते माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने उघडं ठेवलं होतं. मी रोज रोज तेच ऐकून कंटाळले होते. लोक हसत होते. पण मला त्यामुळे अवघडल्यासारखं होण्याची काहीच गरज नव्हती. मी त्याला म्हणाले, "तुम्ही असं का करत आहात? असं करु नका. तुम्ही मला पित्यासमान आहात." त्यानंतर गोष्टी शांत झाल्या," असं अमृताने 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
आपल्यासोबत असं काही घडलं तर काय करावं याबद्दल मनोरंजन क्षेत्रातील तरुणींना काय सल्ला देशील असं विचारलं असताना अमृताने त्यांना थेट डोळ्यात पाहून बोला असं सांगितलं. मी कायम थेट डोळ्यात पाहून, नजरेला नजर देऊन बोलते. असे पुरुष अशाप्रकारे नजरेला नजर मिळवण्यास घाबरतात. मात्र आपण अशी नजर मिळवली नाही तर त्यांची हिंमत वाढते आणि ते समोरच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं अमृताने स्वअनुभवावरुन सांगितलं.
अमृताने हिंदीमध्ये 'गली बॉय', 'सिक्रेड गेम्स', 'रमण राघव 2.0', 'घोस्ट स्टोरीज', 'चोक्ड' आणि 'धमका' सारख्या चित्रपट तसेच वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. अमृताने राष्ट्रीय कला अकादमीमधून अभिनयाचे धडे गिरवले असून ही 46 वर्षीय अभिनेत्री शेवटची 'लस्ट स्टोरीज 2'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 2023 नंतर अद्याप तिने हिंदीत एकाही चित्रपटात काम केलेलं नाही.