Actress Obscene Content Crime: 'बिग बॉस'ची मल्याळममधील माजी स्पर्धक असलेल्या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री एका विचित्र प्रकरणामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तीच नाव आहे, श्वेता मेनन! श्वेताविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर ती कायदेशीर कचाट्यात अडकली आहे. श्वेताविरोधात एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चित्रपट आणि जाहिरातींमधून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी अश्लील सामग्री वापरल्याचा आरोप श्वेतावर करण्यात आला असून तक्रारीनुसार तिच्याविरोधात अजामीनपात्र कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते मार्टिन मेनाचेरी यांनी श्वेताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
मार्टिन यांनी, श्वेता मेनन आर्थिक नफ्यासाठी अडल्ट वेबसाइट्सद्वारे अश्लील सीनच्या वितरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यांचा असा दावा आहे की, श्वेताने चित्रपटांमधील भूमिकांमधून मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर अश्लील सामग्रीचा प्रचार करून पैसे कमविण्यासाठी केला आहे. श्वेताच्या माध्यमातून वितरीत करण्यात आलेले सीन्स सोशल मीडिया आणि अडल्ट साइट्सद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसारित केले गेले, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 (अ) अंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला आहे. जो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील कृत्य असलेली सामग्री प्रकाशित तसेच प्रसारित करण्याशी संबंधित आहे. यामध्ये अनैतिक प्रसारण (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत आरोपांचाही समावेश आहे.
श्वेता मल्याळम चित्रपट कलाकारांच्या संघटनेच्या 'एएमएमए'च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. या निवडणुकीमधील तिच्या उमेदवारीमुळे तिचे नाव अलिकडेच चर्चेत आले आहे. त्यामुळेच या अशा विचित्र प्रकरणामध्ये तिचं नाव समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विविध मल्याळम चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवलेली श्वेता मेननही शेवटची 'बादल' चित्रपटात दिसली होती. श्वेतावर अश्लील साहित्यासंदर्भात अनेक आरोप करण्यात आले असले तरी अद्याप आरोपांबाबत कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
दरम्यान, दुसरीकडे बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीच्या नावांपैकी एक असलेली अभिनेत्री दितिप्रिया रॉयने तिच्या सह कलाकारावर गंभीर आरोप केला आहे. सध्या दितिप्रिया 'चिरोदिनी तुमी जे अमर' या मालिकेत काम करत असून मालिकेत तिचा सहकलाकार असलेला मुख्य अभिनेता जीतू कमलने तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. आपल्याविरोधात चुकीच्या टिप्पण्या केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. आम्ही दोघे एकमेकांचे चुंबन घेत असल्याचा AI वापरुन तयार केलेला फोटो त्याने मला पाठवल्याचा आरोप दितिप्रियाने केला आहे.