Actress who got Married to her Brother in Law : संपूर्ण जगात प्रत्येकाला प्रेम मिळणं शक्य होत नाही. अनेकदा अनेकांची लव्ह स्टोरी ही अर्धवट राहते. आता हे काही फक्त सर्वसामान्यांसोबत होतं असं नाही तर सेलिब्रिटीनींसोबत देखील होतं. कधी-कधी त्यांना देखील त्यांचं प्रेम मिळत नाही. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. त्या काळात तिचं नाव चित्रपटसृष्टीतील लव अफेअर्समध्ये घेतलं जायचं. त्या अभिनेत्रीचं नाव कामिनी कौशल आहे. एकेकाळी त्यांचं नाव ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्यासोबत जोडलं जातं होतं. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते.
भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेलेत, ज्यांचं काम आजही कोणी विसरलेलं नाही विसरता येणं शक्य नाही. त्यातलं एक मोठं नाव म्हणजे कामिनी कौशल. त्यांनी तब्बल 75 वर्षं या चित्रपटसृष्टीत काम केलं आणि प्रत्येक भूमिका ही जीव ओतून साकारली. पण अभिनयाइतकंच त्यांच्या खासगी आयुष्यानंही त्यांना चर्चेत आणलं. एक काळ असा होता जेव्हा दिलीप कुमार यांचं त्यांच्यावर प्रेम होतं.
एका रिपोर्टनुसार, एक काळ असा होता जेव्हा कामिनी आणि दिलीप कुमार एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यावेळी कामिनी आधीपासूनच विवाहित होत्या. त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीच्या पतीशी बी.एस. सूद यांच्याशी लग्न केलं होतं. 1948 मध्ये त्यांच्या बहिणीचं एका अपघातात निधन झालं होतं. त्या वेळी तिच्या मागे लहान मुलं होती. घरच्यांच्या दबावामुळे कामिनी यांनी मनाविरुद्ध जाऊन आपल्या भाओजींशी लग्न केलं. काही काळानं, ‘शहीद’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कामिनी आणि दिलीप यांचं एकमेकांवर प्रेम झालं. पण कामिनी यांच्या भावाला याची माहिती झाली आणि ते खूपच संतापले. त्यांनी थेट दिलीप कुमार यांना जाऊन धमकावलं आणि सांगितलं की, त्यांनी त्याच्या बहिणीपासून दूर राहावं. या धमकीमुळे आणि सामाजिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन कामिनी आणि दिलीप यांनी आपल्या नात्याबद्दल पुन्हा विचार केला. कामिनी यांनी शेवटी आपल्या कुटुंबाचा विचार करत प्रेमाचं त्याग केला.