गायक अदनान सामीने पाकिस्तानी लष्कर देशाच्या भल्याचा विचार करणारं नसल्याची कल्पना असल्यानेच आपण देश सोडण्याचा विचार केल्याचा खुलासा केला आहे. अझरबैजानमधील बाकू येथे फिरण्यासाठी गेला असता तिथे त्याची भेट पाकिस्तानमधील काही तरुणांशी झाली. यादरम्यान त्यांच्याशी नेमका काय संवाद झाला याची माहिती त्याने एक्सवर पोस्ट शेअर करत दिली आहे. तरुणांनी यावेळी पाकिस्तानी लष्कराने आपल्या देशाची वाट लावली आहे असा संताप आपल्याकडे व्यक्त केल्याचं अदनान सामीने सांगितलं.
"बाकूमधील सुंदर रस्त्यांवरुन फिरत असताना पाकिस्तानमधील काही गोड तरुणांची भेट झाली," अशी माहिती अदनान सामीने दिली आहे. पुढे त्याने लिहिलं आहे की, "ते मला म्हणाले की, सर तुम्ही नशिबवान आहात. तुम्ही अत्यंत योग्य वेळी पाकिस्तान सोडला. आम्हाला आमचं नागरिकत्व बदलायचं आहे. आम्ही आमच्या लष्कराचा द्वेष करतो. त्यांनी आमच्या देशाची वाट लावली आहे". अदनान सामीने यावर तरुणांना, मला याची फार आधीच कल्पना आली होती असं सांगितलं.
अदनान सामीचे वडील पाकिस्तानी आणि आई भारतीय आहे. युकेमध्ये जन्म झालेला अदनान सामी 2001 पासून भारतात वास्तव्य करु लागला. 2016 मध्ये औपचारिकपणे भारतीय नागरिक स्विकारण्यापूर्वी त्याने प्रथम व्हिजिटर व्हिसा आणि दुहेरी नागरिकत्व (पाकिस्तान आणि कॅनडा) घेतलं होतं. तेव्हापासूनच त्याने पाकिस्तानविरोधातील आपली भूमिका जाहीरपणे मांडण्यास सुरुवात केली होती.
Met some very sweet Pakistani boys while walking on the beautiful streets of Baku, Azerbaijan…
— Adnan Sami (@AdnanSamiLive) May 4, 2025
They said “Sir, You are very lucky.. You left Pakistan in good time.. We also want to change our citizenship…WE HATE OUR ARMY…They have destroyed our country!!”
I replied “ I knew…
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या एका आठवड्यानंतर अदनान सामीने ही पोस्ट शेअर केली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. इतरांप्रमाणे अदनान सामीनेही जाहीरपणे या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा माणुसकीविरोधातील भयंकर गुन्हा असल्याचं त्याने म्हटलं आहे.
अदनान सामीने पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनाही सुनावलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितलं. यावर फवाद चौधरी यांनी ट्विट करत 'अदनान सामीबद्दल काय?' अशी विचारणा केली. त्यावर सामीने "या अशिक्षित मूर्खाला कोण सांगणार!" असा टोला लगावला.
दुसऱ्या पोस्टला उत्तर देताना अदनान सामीने चौधरींना मूर्ख म्हटलं. "माझे मूळ लाहोरचं नाही तर पेशावरचे आहे. तुम्ही माहिती मंत्री होता आणि तुम्हाला काहीच माहिती नाही".