Riteish Deshmukh Trolled: अभिनेता रितेश देशमुख हा हिंदीबरोबरच मराठी चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घरोघरात पोहोचलेला कलाकार आहे. वडील विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री असल्याने महाराष्ट्रातील जनतेला रितेशबद्दल वेगळा आदर वाटतो. रितेशच्या सोशल मिडिया अकाऊंटवर याची झकल कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळते. रितेश आणि त्याची अभिनेत्री पत्नी जेनेलिया देशमुख हे इन्स्टाग्रामवरील मजेदार रिल्समुळे कायमच चर्चेत असतात. रितेश हा विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जात असला तरी त्याने काही चित्रपटांमध्ये साकारलेल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका चर्चेत राहिल्या आहेत. रितेशने नुकतीच अशी एक भूमिका 'रेड-2' या चित्रपटात साकारली. रितेशने भूमिका साकारताना कोणतीही कसर सोडली नाही. मात्र या चित्रपटातील एका दुष्यावरुन आता रितेशने गंभीर भूमिका केल्यानंतर लोक त्याच्यावर हसत आहेत. सोशल मीडियावर सध्या या चुकीची चांगलीच चर्चा रंगलीये.
अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'रेड 2' याच वर्षी 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झाला. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' चित्रपटाचा हा दुसरा भाग दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. अजयने साकारलेला अमय पटनायक या वेळेस एका केंद्रीय मंत्र्यांचा भांडाफोड करताना दिसत आहे. चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला असला तरी तो नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला असून नेटफ्लिक्सवर तो आता उपलब्ध झालाय. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सध्या टॉप 10 चित्रपटांमध्ये आहे. ओटीटीवर आल्यानेच आता या चित्रपटाची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या रितेशचंही कौतुक होताना दिसतंय. मात्र चित्रपटातील एका चुकीकडे नेटकऱ्यांनी लक्ष वेधलं असून हे दृष्य रितेशवर चित्रित करण्यात आल्याने जीव ओतून काम केल्यानंतरही रितेशचं हसू होताना दिसतंय.
रितेशने चित्रपटामध्ये केंद्रीय मंत्री दादाभाईची भूमिका साकारली आहे. कशाप्रकारे दादाभाई शुन्यातून सारं उभं करतो, लोककल्याणाची कामं करतो असं तो दाखवतो. मात्र त्याचा खरा चेहरा अमय पटनायक जगासमोर आणतो. ही सारी रंजक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मात्र चित्रपटाच्या शेवटाकडे असलेल्या एका दुष्यामध्ये आयकर विभागाची छापेमारी होत असल्याने उद्विग्न झालेला दादाभाई थेट पंतप्रधानांना धावत्या कारमधून फोन लावतो. मात्र हा फोन तो मोबाईलवरुन न लावता लँड लाइनवरुन लावतो, असं दृष्यात दिसत आहे. दादाभाईच्या हातात कारमध्ये बसलेला असताना वायर्ड रिसिव्हर दाखवण्यात आला आहे. नंतर तो हाच रिसिव्हर चिडून आपटताना दाखवलं गेलं आहे. आता हा दृष्य पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की दादभाईकडे म्हणजेच रितेशकडे धावत्या कारमध्ये लँडलाइन कसा आला? बरं आला तर आला तो कारमध्ये कनेक्ट कसा केलाय? इंटरनेटवर यासंदर्भातील बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या असून अनेकांनी यावरुन खिल्ली उडवल्याचं दिसतंय. अशीच एक पोस्ट खाली पाहा...
दरम्यान, 'रेड 2' चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा हिंदी चित्रपट ठरलाय. सध्या तो ओटीटीवर ट्रेंड होतोय.