बॉलिवूडमध्ये अनेकदा निर्मात्यांना एखादा चित्रपट तयार करताना जोखीम पत्करावी लागते. याचं कारण जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही, तर त्यांचा सर्व पैसा पाण्यात बुडतो. अनेक निर्मात्यांना करोडोंचं नुकसान सहन करावं लागतं. पण बॉलिवूडमध्ये ही जोखीम पत्करल्याशिवाय पर्याय नसतो. कारण जर चित्रपट चालला तर हीच कमाई दुप्पट होते. हिंदी चित्रपटसृष्टीत असाच एक अभिनेता होता, ज्याने अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार केले आणि आपलं नाव सुवर्णक्षरात नोंदवलं. या दिग्गज अभिनेत्याला देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखलं जातं. हा अभिनेता दुसरा कोणी नसून मनोज कुमार आहेत. त्यांना भारत कुमार नावाने ओळखलं जातं. 4 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. मनोज कुमार यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांसाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं.
मनोज कुमार यांनी एकूण 7 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. यामध्ये उपकार, रोटी कपडा और मकान, पूरब और पश्चिम सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मनोज कुमार यांनी असाच एक चित्रपट दिग्दर्शित केला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं होतं. या चित्रपटाचं नाव 'क्रांती' होतं, जो 1981 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई कऱणारा चित्रपट होता. मनोज कुमार यांनी हा चित्रपट तयार करताना रक्त आणि पाणी एकत्र केलं होतं. या चित्रपटात त्यांनीही भूमिका निभावली होती.
या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा, दिलीप कुमार, मनोज कुमार, हेमा मालिनी, प्रेम चोप्रा आणि परवीन बाबी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे.
'क्रांती' चित्रपटाची पटकथा 'शोले'चे लेखक सलीम-जावेद यांनी लिहिली होती. मनोज कुमार 4 वर्षांनी 'क्रांती' या चित्रपटाद्वारे पडद्यावर परतले होते. क्रांतीचं बजेट 3 कोटी होतं. पण चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होताच निर्मात्यांनी माघार घेतली. यानंतर मनोज कुमार यांनी या चित्रपटासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले होते. यासाठी मनोज कुमार यांनी दिल्लीतील आपला बंगला विकला आणि मुंबईतील आपली मालमत्ताही पणाला लावली.
क्रांतीने प्रदर्शित होताच थिएटरमध्ये खळबळ उडवून दिली. हा चित्रपट 400 दिवस थिएटरमध्ये होता. क्रांतीचा रौप्यमहोत्सव आणि सुवर्णमहोत्सवही साजरा करण्यात आला. क्रांतीने कमाईत शोले चित्रपटाला मागे टाकलं होतं. 'शोले'ने 15 कोटी रुपये आणि 'क्रांती'ने 20 कोटी रुपये कमावले होते. पण क्रांती नंतर मनोज कुमार यांना एकही हिट चित्रपट मिळाला नाही आणि त्यांची कारकीर्द संपली.