Sainkeet Kamat: 'सावळ्याची जणू सावली' या लोकप्रिय मालिकेत सारंग मेहेंदळे ही भूमिका साकारणारा साईंकित कामत सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचा डॅशिंग आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. प्रेक्षक त्याच्या अभिनयशैलीचे भरभरून कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे, साईंकित आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.
चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या साईंकितने टेलिव्हिजन विश्वातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 'सावळ्याची जणू सावली'मध्ये काम करत असतानाच त्याने याआधी 'तुझं माझं ब्रेकअप', 'रात्रीस खेळ चाले', 'रात्रीस खेळ चाले 2' आणि 'रात्रीस खेळ चाले 3' या गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत साईंकितने अण्णा नाईक यांचा धाकटा मुलगा अभिराम हरी नाईक ही भूमिका साकारली होती. पहिल्या आणि दुसऱ्या भागात अभिराम शिक्षणासाठी मुंबईत गेलेला असतो, त्यामुळे काही काळ कुटुंबापासून दूर राहतो. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा तो नाईक वाड्यात परततो, तेव्हा कथानकाला नवे वळण मिळते. अंधश्रद्धा आणि गूढ घटनांकडे तो समजूतदारपणे पाहतो आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. तिसऱ्या भागात अभिराम बंगळुरूमध्ये आपल्या दुसऱ्या पत्नी कावेरीसोबत स्थायिक झालेला असतो, तरीही नाईक वाड्याचा वारसा जपण्यासाठी तो पुन्हा पुढे सरसावतो. अभिराम हे पात्र आधुनिक विचारांचं संतुलन राखणारा, नाळ जपणारा आणि परिवर्तन घडवणारा व्यक्ती म्हणून उभा राहतो. साईंकितने ही भूमिका अत्यंत संयम, भावनिक सखोलता आणि प्रभावी अभिनयाने साकारली.
हे ही वाचा: 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर सलमान संतप्त; रागात दरवाजा आदळल्याने लाइटमन जखमी
आपल्या प्रवासाबद्दल बोलताना साईंकित म्हणतो, 'टीव्ही हे अभिनयाचं खऱ्या अर्थाने रियाजाचं माध्यम आहे. चित्रपट वर्षातून काही मर्यादित वेळा होतो, पण मालिकांमधून रोज काम करताना अभिनयसुद्धा घडत जातो.' नाटकाविषयी तो सांगतो, 'ललित कला केंद्र येथे शिक्षण घेत असताना अनेक नाटकं केली. 'या गोजिरवाण्या घरात' या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. सध्या मालिकांमुळे वेळ मिळत नाही, पण रंगभूमीबद्दलचा आदर कायम आहे.' या शिवाय साईंकितने 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात विदर्भीय भाषेचा वापर करण्यात आला आहे.
साईंकित कामतचा प्रवास केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा नाही, तर तो एक सतत शिकत राहण्याचा प्रवास आहे - आणि प्रत्येक भूमिकेतून तो हे सिद्ध करत आहे.