मुंबई : प्रियकरानं लग्नास नकार दिल्यामुळं अभिनेत्रीनं लाईव्ह व्हिडिओमध्येच विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. कन्नड अभिनेत्री चंदना हिच्यासोबत मागील पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तिच्या प्रियकरानं लग्न करण्यास नकार दिल्यामुळं चंदनानं वयाच्या २९ व्या वर्षी आत्महत्या केली.
आत्महत्येचा व्हिडिओ चित्रीत करत तिनं तो प्रियकर, त्याचं कुटुंब आणि स्वत:च्या कुटुंबाला पाठवला. ती वास्तव्यास असणाऱ्या क्रिष्णमूर्ती लेआऊट येथेच ही घटना घडली. सूत्र आणि पोलिसांच्या माहितीनुसार चंदनानं २८ मे रोजीच आत्महत्या केली होती. पण, तिच्या आत्महत्येचं वृत्त मात्र १ जुनला सर्वांपुढे आलं.
दिनेश नावाच्या व्यक्तीसोबत चंदना मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. त्या दोघांच्याही कुटुंबीयांना या नात्याची कल्पना होती. त्यानं तिला लग्नाचं वचनही दिलं असल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नव्हे, तर आपल्या कुटुंबीयांशी लग्नाची चर्चा करण्यासाठी चंदनाच्या कुटुंबीयांनी पुढाकार घ्यावा यासाठी तो आग्रही होता. सूत्रांच्या माहितीनुसार चंदना आणि तिचे कुटुंबीय दिनेशच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले तेव्हा तिच्या चारित्र्यावर त्याच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थि केला.
गेली पाच वर्षे आपला वापर केल्याची भावना तिला सतावत होती...
एका प्रसिद्ध स्थानिक दैनिकाच्या वृत्तानुसार चंदनाने व्हिडिओच्या सुरुवाचीलाच आपलं आयुष्य संपवणंच योग्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय तिनं आपल्या या टोकाच्या निर्णयासाठी दिनेशलाच दोष दिला आहे. या देनिकाच्या वृत्तानुसार दिनेशनं चंदनाकडून पैसेही घेतले होते. इतकंच नव्हे, तर गेल्या काही दिवसांपासून तो तिला वारंवार टाळत होता.
चंदनानं आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाला नवी वळणं मिळत आहेत. दिनेशचं नाव चंदनाव्यतिरिक्त इतरही काही मुलींशी जोडलं जात आहे. किंबहुना चंदनाला दिनेश फसवत असल्याची तिच्या कुटुंबियांना कल्पना होती ही बाबही यात पुढे येत आहे. चंदनाने चित्रीत केलेल्या व्हिडिओमध्ये मागील पाच वर्षांमध्ये शक्य त्या सर्व मार्गाने आपला वापर केला गेल्याची खंत तिनं व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
दिनेशनंच नेलं रुग्णालयात...
चंदनाला दिनेशनंच रुग्णालयात नेल्याची धक्कादायक बाब अनेकांच्या भुवया उंचावत आहे. रुग्णालयात नेलं असता कोणतेही उपचार होण्यापूर्वीच चंदनाला मृत घोषित करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार तिच्या मृत्यूची माहिती मिळताच दिनेशनं रुग्णालयातून पळ काढला. त्या क्षणापासून तो फरार आहे. सध्याच्या घडीला एकंदर परिस्थिती पाहता दिनेश आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात सद्दगुंटे पाल्य पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.