Marathi News> मनोरंजन
Advertisement

मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्र सरकार थेट Netflix च्या अमेरिकेतील हेडक्वॉर्टर्समध्ये पोहोचलं; 'अमेरिका...'

Marathi Movie Netflix Office: वरळीत पार पडलेल्या 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात शेलार यांनी दिली माहिती.

मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्र सरकार थेट Netflix च्या अमेरिकेतील हेडक्वॉर्टर्समध्ये पोहोचलं; 'अमेरिका...'

Marathi Movie Netflix Office: महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मंगळवारी मुंबईमध्ये एक मोठी घोषणा केली. वरळी येथील एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे पार पडलेल्या 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये बोलताना शेलार यांनी मुंबईत कुठेही चित्रीकरणासाठी नि:शुल्क परवानगी दिली जाणार असल्याचं जाहीर केलं. मुंबईतील कोणत्याही ठिकाणावर चित्रीकरणासाठी आता नि:शुल्क परवानगी दिली जाणार आहे. तसेच राज्यातील विविध चित्रपट निर्मिती स्थळांवर सुलभ दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे शेलार यांनी सांगितले. यावेळेस शेलार यांनी नेटफ्लिक्सकडे महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेल्या मागणीबद्दलचीही माहिती दिली.

एफएम रेडिओ चॅनेल्सशी राज्य शासनाची चर्चा

मराठी चित्रपटांचा जागतिक पातळीवर  प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रवींद्र नाट्य मंदिर) येथे आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'एफएम' रेडिओवर मराठी गाणे व कार्यक्रमांसाठी ठराविक वेळ देण्याबाबत एफएम रेडिओ चॅनेल्सशी चर्चा केली असून त्यासाठी पुरस्कार योजना देखील जाहीर केली असल्याचे यावेळी शेलार यांनी सांगितले.

नेटफ्लिक्सच्या मुख्यालयात केलेल्या मागणीचा उल्लेख

"अमेरिका दौऱ्यात नेटफ्लिक्सच्या लॉस एंजेलिस येथील मुख्यालयात मराठी चित्रपटांना स्थान देण्याची मागणी केली आहे," असंही शेलार यांनी सांगितले. "मराठी सिनेमा, चित्रपटगृहे आणि निर्मात्यांना हक्काचे स्थान मिळावे, यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने काम करत आहोत," असेही शेलार यांनी स्पष्ट केलं. 

कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गजलगायक भीमराव पांचाळे यांना 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025' प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पद्मश्री काजोल देवगण यांना स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024, पद्मभूषण अनुपम खेर यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 आणि निर्माते महेश मांजरेकर यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पहिला 'छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार'ही जाहीर 

यावर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला 'छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025' हा  युनेस्कोतील भारताचे कायस्वरूपी प्रतिनिधी राजदूत विशाल शर्मा यांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, दुर्ग अभ्यासक माधव फडके यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी 60 आणि 61 व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला कोणकोण उपस्थित होतं?

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,  राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे - पाटील, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार, कलारसिक, प्रेक्षक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. यावेळी हीरक महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Read More