Ashok Saraf Padma Shri : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे सम्राट आणि विनोदाचे बादशाह अशी ओळख असणारे दिग्गज अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अशोक मामा यांना काल पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या अभिनय क्षेत्रात 5 दशकांपेक्षा जास्त काळ काम केलं. त्यात फक्त त्यांनी मराठी चित्रपट केले असं नाही तर हिंदी चित्रिपटसृष्टीत देखील काम केलं. यावेळी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांच्या आणि दिवंगत अभिनेते लश्र्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
अशोक सराफ यांना यावेळी विचारण्यात आलं की 'पद्मश्री मिळाला तो क्षण तुमच्यासाठी खास होता आणि या क्षणी लक्ष्मीकांत बेर्डे हे तुमचे जीवलग मित्र. तर या क्षणी तुम्हाला त्यांची किती आठवण येते.' त्याविषयी बोलताना ते म्हणाले की 'मला त्याची फार आठवण येते. आम्ही मराठीत 50 चित्रपट केले आहेत. त्यातील अर्ध्याहून जास्त हिट आहेत. आमची जोडी जमली होती. माझं जे टायमिंग होतं, तेच त्याचं होतं. तो मला फार ज्युनियर आहे. आमच्या दोघांचं टायमिंग एकत्र जुळायचं आणि त्यामुळे लोकांना पाहायला आवडायचं. ते नंतर राहिलं नाही, आमची जोडी होती. मराठी चित्रपटसृष्टीचा जेव्हा पडता काळ होता तेव्हा आम्ही दोघांनी लोकांना चित्रपटगृहापर्यंत येण्यास भाग पाडलं. बघा मराठी चित्रपट बघा.'
पद्मश्री पुरस्कार मिळण्याविषयी विचारताच अशोक सराफ म्हणाले, 'माझा एकंदर आतापर्यंतचा जो प्रवास आहे. मी करिअरसाठी जे समर्पित केलं होतं त्यावर झालेला हा शिक्कामोर्तब आहे. याचा मला फार आनंद झाला. लोकांनी त्याचं कौतुक करावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.'
हेही वाचा : अशोक सराफ यांच्या यशामागे असणारे 'मामा' कोण? स्वत: केला खुलासा, म्हणाले 'लहानपणी...'
दरम्यान, तुम्ही चित्रपटसृष्टीत इतकं योगदान दिलं असताना हा पुरस्कार मिळण्यासाठी उशीर झाला का? त्यावर उत्तर देत अशोक मामा म्हणाले, 'उशीर झाला असं वाटत नाही. त्याचेही काही निकष असतील. माझ्यापेक्षा चांगले लोक त्यांना आधी भेटले असतील.तो क्रम लागलेला आहे ना. त्यामुळे त्यांना आधी मिळणं हे सहाजिक आहे. मला आनंद आहे की मला मिळाला कारण मिळणं हे महत्त्वाचं आहे.'