Marathi News> मनोरंजन
Advertisement

अशोक सराफ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, पाहा प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगवणारा VIDEO

Ashok Saraf Padma Shri: ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.   

अशोक सराफ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, पाहा प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगवणारा VIDEO

Ashok Saraf Padma Shri: ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री देण्यात आला. फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही अनेक अजरामर भूमिका साकारत अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विश्वांमध्ये वावरणारे अशोक सराफ यांचं विनोदाचं टायमिंग आजही तितकंच जबरदस्त आहे. अभिनयाचे सम्राट अशोक अशी उपाधी लाभलेल्या अशोक सराफ यांना पद्मश्री मिळाल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची छाती अभिमानाने फुलली आहे. 

राष्ट्रपती भवनात मंगळवारी दुसऱ्या टप्प्यातील पद्मश्री पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 68 मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. यामध्ये अशोक सराफ यांचाही समावेश होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तसं पाहिल्यास, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. 

अशोक सराफ यांनी इंस्टाग्रामला पद्मश्री पुरस्कार स्विकारतानाच व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार — तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या," असं त्यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

"असा सन्मान होणं मोठी गोष्ट आहे. हा एक मोठा पुरस्कार आहे. माझा त्यासाठी विचार केला, मला त्यासाठी पात्र समजलं याबद्दल आभारी आहे. मी नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असावं," अशी भावना त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली. उशीर झाला असं वाटत नाही. मला विसरले नाहीत हे महत्त्वाचं आहे. पुरस्कार दिला ही मोठी गोष्ट आहे असंही ते म्हणाले. 

अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली मुंबईत झाला. जानकी या चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं होतं. दादा कोंडके यांच्यासह त्यांनी 'पांडू हवालदार' चित्रपटात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. आयत्या घऱात घऱोबा, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, भूताचा भाऊ, धूमधडाका, गंमत जंमत अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय बॉलिवूडमध्ये करण अर्जुन, येस बॉस, सिंघम, कोयला, गुप्त अशा अनेक हिट चित्रपटात ते झळकले आहेत. 

महाराष्ट्रातील अनेकांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. 

Read More