Ashok Saraf Padma Shri Indigo Viral Video : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे सम्राट आणि विनोदाचे बादशाह अशी ओळख असणारे दिग्गज अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अशोक सरफा यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनय क्षेत्रातील 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर दिल्लीवरून मुंबईला परत येत असताना ते ज्या विमानानं प्रवास करत होते त्या विमानाची पायलेट ही त्यांची भाचीच होती. अशात अशोक सराफ यांच्या भाचीनं त्यांचं विमानात कसं स्वागत केलं याविषयी जाणून घेऊया.
निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे ही यावेळी त्यांच्या विमानाची पायलेट होती. आता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे दिल्लीवरून मुंबईला ज्या विमानानं येत होतेय त्यांची फ्लाइटची कॅप्टन अदिती आहे. यावेळी अदितीनं विमानात उद्घोषणा करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे. अदितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अदिती उद्घोषणा करताना बोलते की 'नमस्कार. मी तुमची फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे. दिल्ली ते मुंबई या विमानप्रवासात तुम्हा सर्वांचे खूप-खूप स्वागत आहे. हा आजचा विमानप्रवास माझ्यासाठी खरंच खूप खास आहे त्याचं कारण म्हणजे, माझे काका अशोक सराफ या हे देखील आपल्यासोबत प्रवास करत आहे. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. मला खूप अभिमान वाटतोय की, आज त्यांच्यासोबत मी दिल्ली ते मुंबई हा प्रवास करणार आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, प्लीज जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. ही फ्लाइट आणि आजचा हा प्रवास माझ्यासाठी खूपच स्पेशल आणि भावनिक आहे.'
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना अदितीन कॅप्शन दिलं की 'हा अतिशय खास आणि भावनिक क्षण होता. आपल्या आयुष्यात एकदाच येणारी अशी ही फ्लाईट…अशोक काकांच्या फ्लाइटची कॅप्टन म्हणून प्रवास करायला खूप अभिमान वाटतोय. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन!' अदितीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.