Saiyaara Actor Family : हिंदी कलाविश्वामध्ये सध्या चर्चेत असणारा एकमेव चित्रपट म्हणजे, 'सैयारा'. मोहित सूरी दिग्दर्शित या रोमँटिक चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रदर्शिकत होण्याच्या पहिल्या दिवसापासून दमदार कमाई केल्याचं पाहायला मिळालं. तरुण प्रेक्षकांनीसुद्धा या चित्रपटाला आणि त्यातील कलाकारांना अक्षरश: डोक्यावर घेतलं असून, आता मध्यवर्ची भूमिका साकारणाऱ्या अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या समीकरणाचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.
रील, शॉर्ट्सपासून ते अगदी इन्स्टापोस्टमध्येसुद्धा हेच चेहरे आणि त्यांच्या चित्रपटाची वाहवा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. रातोरात प्रसिद्धीझोतात आलेल्या अहान पांडेचा हा पहिलाच चित्रपट असून, हा नवोदित अभिनेता कलाविश्वात नवा नाही. कारण, त्याचा जन्मच एका कलाकार कुटुंबात झाला.
चंकी पांडेचा पुतण्या असणारा अहान पांडे चिक्की पांडेचा मुलगा. चिक्की पांडे चंकी पांडेचे धाकटे बंधू. एकिकडे चंकी कलाविश्वात प्रसिद्धी मिळवत असतानाच दुसरीकडे चिक्कीनं मात्र कलाजगातापासून दूर राहत व्यवसाय क्षेत्रात प्रगती केली. आश्चर्याची बाब म्हणजे बॉलिवूडचा किंग, अभिनेता शाहरुख खान हा चिक्की पांडेचा खास मित्र आहे.
अहान पांडेचे वडील, चिक्की पांडे आणि शाहरुखचं खास मैत्रीपूर्ण नातं आहे. कैक वर्षांपारूनची त्यांची मैत्री इतकी घट्ट आहे की अडीअडचणीच्या वेळीसुद्धा ते कायम एकमेकांच्या मदतीसाठी पुढे असतात. 1994 मध्ये शाहरुख खानला एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तेव्हा नाना पाटेकर आणि चिक्की पांडे यांनीच पुढाकार घेच त्याची सुटका केली होती. शाहरुखला जामीन मिळवून देण्यात चिक्कीची महत्त्वाची भूमिका होती असं म्हटलं जातं. तेव्हापासून ही मैत्री आजतागायत टिकून आहे.
अहान पांडे आणि शाहरुखचा मुलगा आर्यन खान, मुलगी सुहाना खान यांच्यातही मैत्रीपूर्ण नातं आहे. अहानची आई एकेकाळी भारतातील आघाडीच्या मॉडेलपैकी एक होती. सध्या ती बॉलिवूडमध्ये लाईफस्टाईल कोच म्हणून काम करत असून, सोशल मीडियावर तिचा फॅशन सेन्स कमालीचा चर्चेच असतो.