बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूच्या करिअरची सुरुवात यशस्वी झाली होती. तिने राज आणि अजनबीसारखे हिट चित्रपट दिले होते. राज चित्रपट तर सुपरहिट ठरला होता, ज्याची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. तीन वर्षांच्या कारकिर्दीनंतर बिपाशा बासूने महेश भट्ट यांचा जिस्म चित्रपट स्विकारला होता. मात्र चित्रपटाची बोल्ड थीम आणि धाडसी शीर्षक त्यावेळी जोखमीचं मानण्यात आलं होतं. तसंच यामुळे तिच्या चांगल्या करिअरला हानी पोहोचू शकते असा सल्लाही अनेकांनी दिला होता. पण आपल्याला कथा आवडल्याने आपण चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता असं बिपाशाने सांगितलं आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बिपाशा बासूने जिस्म चित्रपट साईन करत आपण हिंदी चित्रपटातील पारंपारिक अभिनेत्रीला छेद दिल्याचं बिपाशाने सांगितलं आहे. "जिस्म हा तो काळ होता जेव्हा मी यशाच्या शिखरावर होते आणि सर्वजण मला म्हणायचे, 'तू अॅडल्ट कंटेंट असणारा चित्रपट करू शकत नाहीस. तू त्या सामान्य हिंदी नायिकेसारखी आहेस जिने लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे' आणि मी म्हणाले, मला ही कथा खूप आवडली आहे. मी तो चित्रपट करण्याचं ठरवलं होतं. सर्वांनी मला ते करण्यापासून रोखलं होतं. माझ्या मॅनेजरला तर मी वेडी झाली असं वाटत होतं," असं ती म्हणाली.
या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत महिलांच्या भूमिकांबद्दलच्या धारणा बदलल्या, ज्यामध्ये ग्रे शेड किंवा नकारात्मक भूमिकांचा समावेश होता असा दावा बिपाशाने केला आहे. तसंच सौंदर्य आणि फॅशन ट्रेंडवर त्याचा परिणाम झाल्याचंही सांगितलं. "मला त्याचा फायदा झाला आणि नंतर गोष्टी बदलल्या. महिला केसांची स्टाईल बदलू लागल्या. त्यांनी ब्राँझ लूक निवडला. अशी कोणतीही रूढीवादी (विचारसरणी) नव्हती की स्त्री नकारात्मक भूमिका साकारू शकत नाही. त्यानंतर सर्व काही बदलले. म्हणून तो माझ्यासाठी विचारांना छेद देणारा चित्रपट ठरला. तो एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे," असं ती म्हणाली.
'टिंडर स्वाइप राईड'वरील एका चर्चेत निर्माती पूजा भट्टने जिस्मच्या चित्रीकरणादरम्यानचा तिचा स्वतःचा अनुभव शेअर केला होता. जिस्मच्या चित्रीकरणादरम्यान इंटिमेट सीन शूट करण्याआधी आपण बिपाशा बासूला काही त्रास नाही ना याची काळजी घेत होतो. मात्र जॉन अब्राहमशी असे सौजन्य दाखवलं नाही असा खुलासा तिने केला होता.
"मी त्यांना काय आवश्यक आहे ते समजावून सांगण्यासाठी गेले होते आणि मी बिपाशाला सांगत आहे की आपल्याला हेच करायचे आहे, पण जर तुम्हाला हे करताना काही तसदी जाणवली...त्यानंतर जॉनने फक्त माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, 'माफ करा? पण कोणीतरी मलाही तुला काही समस्या आहे असं विचारा?' माझ्यासाठी, ते जणू कोणीतरी माझ्यावर थंड पाण्याची बादली फेकल्यासारखे होते. मी म्हणाले, आम्ही किती अहंकारी महिला आहोत ज्यांना एखाद्या इंटिमेट सीनमध्ये फक्त महिलाच आरामदायी नसतात असं वाटतं", असं पूजा म्हणाली.