The Great Indian Kapil Show : नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी भागात ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाची स्टारकास्ट झळकणार आहे. या भागात अजय देवगन, मृणाल ठाकुर, रवि किशन, संजय मिश्रा, विंदू दारा सिंग, कुब्रा सैत आणि दीपक डोबरियाल स्टेजवर धमाल करताना दिसणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात विनोदी क्षणांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे या भागात नेहमीप्रमाणे कपिल शर्मा नव्हे तर बॉलिवूड अभिनेता अजय देवगन स्वतः या शोचे सूत्रसंचालन करताना आणि नवज्योतसिंग सिद्धू यांची फिरकी घेताना दिसणार आहे.
'...म्हणून मी कपिलच्या शोमध्ये गंभीर असतो'
'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी भागाच्या प्रोमोमध्ये एक मजेशीर क्षण असा आहे की, कपिल शर्मा हा अजय देवगनला विचारतो की, गोलमालसारख्या धमाल चित्रपटात तुम्ही इतकी कॉमेडी करता मग आमच्या शोमध्ये इतके गंभीर का दिसता? यावर अजय देवगन अत्यंत मिश्किलपणे उत्तर देतो म्हणतो की, चित्रपटामध्ये मी जे काही करतो त्यासाठी मला पैसे मिळतात. मात्र, इथे जर काही केलं तर त्याचे पैसे कपिलला मिळतात.
त्यानंतर अजय देवगन नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर भाष्य करत म्हणतो, सिद्धू पाजींनी एक रुमाल क्रिकेटमध्ये टाकला, एक राजकारणात. पण इथे तर पूर्ण चादरच टाकली आहे. हे वक्तव्य ऐकताच सगळे जोरजोरात हसायला लागतात.
'हा अभिनेता झोपण्यापूर्वी बायकोच्या पाया पडतो'
यात आणखी एक मजेदार भाग म्हणजे कपिल शर्मा पुढे म्हणतो की, रवि किशन झोपण्याआधी त्यांच्या पत्नीच्या पाया पडतात असं ऐकलं आहे. यावर अजय देवगन लगेचच टोमणा मारतो. जो जितका मोठा गुन्हेगार असतो, तो तितकाच पत्नीचे पाय धरतो. हे ऐकताच मंचावरील सर्व कलाकार आणि प्रेक्षक हसून लोटपोट होतात. तसेच, पुढे अजून एक तिखट-गोड टिप्पणी करत अजय देवगन म्हणतात, नेत्याच्या हातात माईक देऊ नका, तो त्यांच्या तोंडातच लावायला हवा.
दरम्यान, या प्रोमोतून स्पष्ट होते की, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा हा भाग प्रेक्षकांसाठी हास्याचं तुफान घेऊन येणार आहे आणि अजय देवगनचा हटके अंदाज नक्कीच हायलाईट ठरणार आहे.