Sikandar : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा 'सिकंदर' चित्रपट ईदच्या मुहुर्तावर रिलीज झाला आहे. सलमानचे चाहते 'सिकंदर' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अशातच आता सलमान खानच्या काही चाहत्यांनी थेट थिएटरमध्ये चक्क फटाके फोडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चित्रपट सुरु असताना चाहत्याने थेट थिएटरमध्ये फटाके फोडल्यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ उडाला. काही प्रेक्षकांनी थिएटरमधून पळ काढला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नाशिकच्या मालेगावमधील असल्याचं म्हटलं जात आहे.
'सिकंदर' चित्रपटामध्ये सलमानच्या एन्ट्रीवेळी चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडले आणि राडा घातला. या व्हिडीओमध्ये असा भयंकर प्रसंगही कैद झाला की, काही लोक स्वतःला वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. तर काही प्रेक्षक हा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये शूट करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो चर्चेत आला आहे. सलमान खानच्या या चित्रपटातील 'जोहरा जबीन' हे गाणं आल्यावर प्रेक्षक नाचूही लागले आहेत.
थिएटरमध्ये फटाके फोडल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल
सदरचा हा व्हिडिओ मालेगाव फॅन क्लब या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. याआधीही सलमान खानचा'टायगर 3' चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी देखील सलमानच्या चाहत्यांकडून थिएटरमध्ये फटाके फोडण्यात आले होते. त्यावेळी सलमान खानने कोणाचाही जीव धोक्यात न घालता चित्रपट एन्जॉय करा असं चाहत्यांना आवाहन केलं होतं.
Malegaon Fan Club #Sikandar pic.twitter.com/Qv42bgJ0Dx
— Radhe Bhai Editx (@Radhe_Bhai_027) March 31, 2025
तिसऱ्या दिवशी सलमानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या कमाईमध्ये घट
सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट 30 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. सलमान खानचा हा चित्रपट 'छावा' चित्रपटाला मागे टाकेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या कमाईमध्ये तिसऱ्या दिवशी घट झाल्याचं समोर आलं आहे.