संजय खान (Sanjay Khan) आणि शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn Sinha) 70 आणि 80 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी होते. बॉलिवूडमध्ये दोघांचा एक वेगळा दबदबा होता. दोघेही आपल्या नियमांनुसार आयुष्य जगण्यासाठी ओळखले जात होता. प्रत्येक मोठ्या पार्टीला दोघं हजेरी लावत असत. दरम्यान अशाच एका पार्टीत संजय खान आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या मित्रांसह संजय खान यांच्या घराबाहेर गोळीबार केला होता. ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
विक्की ललवानी यांना दिलेल्या मुलाखतीत रणजीत यांनी सांगितलं की, "एका पार्टीत मला जायचं होतं. संजय खान, झिनत अमान, शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते. हा काळ असा होता जेव्हा संजय यांना फार चांगलं काम मिळत नव्हंत. झिनत यांच्यासोबत त्यांचं अफेअर सुरु होतं. झिनत त्यांच्यासोबत एक चित्रपट करणार होती. याशिवाय त्यांच्या आर्थिक गोष्टीही सांभाळत होती".
रणजीत यांनी सांगितलं की, ते स्वत: या पार्टीत नव्हते. पण त्यांनी त्यांच्या मित्राकडून सगळा किस्सा ऐकला, जो पार्टीत उपस्थित होता. अभिनेत्याने सांगितलं की, "मला माझ्या मित्राने सांगितलं की शत्रुघ्न सिन्हाने संजय खानचे गाल खेचले जे त्याला आवडलं नाही आणि त्याने शत्रुघ्न सिन्हाच्या कानाखाली लगावली. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. रीना रॉय जी त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह नात्यात होती तीदेखील तिथे उपस्थित होती. ती फार संतापली होती. संजयन तिच्याशीही भांडण केलं. प्रकरण इथपर्यंत गेलं की संजयने जर माझ्याशी डील करायचं असेल तर बाहेर भेट. पार्टी खराब नको करुयात".
नंतर सर्वजण पार्टी सोडून रणजीत यांच्या घरी पोहोचले. रणजीत यांचं घर नेहमीच सर्वांसाठी खुलं असायचं. त्यांनी सांगितलं की, "त्यावेळी संभाषणासाठी फोन नव्हते. मी तेव्हा माझ्या प्रेयसीसह राहत होतो आणि लोकांनी तिला पाहावं अशी माझी इच्छा नव्हती. मी स्वत:ला घरात बंद केलं. अचानक मी गोळ्यांचा आवाज ऐकला. त्यांनी हवेत गोळीबार केला आणि नंतर संजय खान यांच्या घरी गेले. ते सर्वजण शत्रुघ्न सिन्हाचे मित्र होते. मी माझ्या प्रेयसीला ड्रॉप करण्यासाठी वाट पाहत होतो".
रणजीत यांनी पुढे सांगितलं की, "मी गर्लफ्रेंडला ड्रॉप करुन परत आलो असता, संजय खान घरात बसलेला होता. मी त्याला विचारलं, तू इथे काय करत आहेस? त्याने मला सगळा किस्सा सांगितला. तो त्यावेळी खूप रागात होता. तो म्हणाला, हे मूर्ख 21 व्या शतकात गोळ्या चालवत आहेत. त्यांनी माझ्या घरावरही गोळीबार केला. त्याला पोलीस तक्रार करायची होती. पण मी म्हटलं की, आपण चर्चा करुन प्रकरण मिटवूयात. अन्यथा केस दाखल करु".
या सर्व चर्चांनंतर संजय खान यांनी प्रकाश मेहरा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना आपल्या घरी बोलावलं होतं. शत्रुघ्न आणि प्रकाश मेहरा त्यावेळी एकत्र चित्रपट बनवत होते. यामुळे ते नेहमी एकत्र असायचे. रणजीत त्यांच्या घरी पोहोचले असता सगळी परिस्थितीच बददली. रणजीत यांनी सांगितलं की, "प्रकाश आणि शत्रुघ्न माझ्या घरी वाट पाहत होते. संजय तेव्हा आलेला नव्हता. यानंतर मी एक कार येताना पाहिला. त्यात झिनत आणि एक वकील होता. यानंतर मी चारी बाजूंनी सायरन ऐकले. मला लक्षात आलं की पोलिसांनी माझ्या घराला चारी बाजूंनी घेरलं आहे. संजयने पोलिसांना सांगितलं की, सगळे मला जीवे मारण्यासाठी एकत्र जमले आहेत. यानंतर मी पोलिसांशी बोललो. संजयला माझ्या घरी येण्यासाठी तयार केलं. संजयने शत्रुघ्न यांच्यावर राग व्यक्त केला. मी त्याला शत्रुघ्नने तुझ्या करिअरसाठी बरंच केल्याची आठवण करुन दिली".
रणजीत यांनी सांगितलं की, ते शत्रुघ्न, प्रकाश मेहरा आणि संजय यांना घरी सोडून त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर गेले होते. संध्याकाळी त्यांना कळलं की पोलिसांनी शत्रुघ्न आणि प्रकाश मेहरा यांना सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नेलं आहे. दिलीप कुमार यांना हस्तक्षेप करावा लागला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये 'रणजीतच्या घरी हत्येचा कट रचण्यात आला' अशा मथळ्याखाली बातम्या छापण्यात आल्या. तथापि, हा वाद नंतर मिटला.