Alia Bhatt At Cannes 2025: वॉर्डरोब माल्फंक्शन हा शब्द अनेकदा कलाविश्व किंवा फॅशन जगताशी संबंधित काही प्रसंगांमध्ये कानांवर येतो. नुकत्याच पार पडलेल्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये याचीच काही उदाहरणंसुद्धा पाहायला मिळाली. अगदी बॉलिवूड अभिनेत्री आणि हिंदी सिनेजगतातील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा यास अपवाद ठरली नाही.
आलियानं मागील काही वर्षांमध्ये कलाविश्वामध्ये निर्माण केलेलं तिचं स्थान पाहता परदेशातही तिचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. याच चाहत्यावर्गानं आलियाची एक झलक टीपण्यासाठी म्हणून कान्स सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळाबाहेर गर्दी केली होती. माध्यमांच्या अनेक प्रतिनिधींच्या नजरासुद्धा आलियावरच खिळल्या होत्या. गुची (Gucci) या ब्रँडनं तिच्यासाठी कस्टमाईज केलेली एक कमाल डिझाईनची साडी आणि मोकळे केस असा तिचा लूक पाहताक्षणी चाहत्यांच्या मनात घर करून गेला.
आलिया रेड कार्पेटवर आली आणि तिथं तिनं फोटोंसाठी पोझ देण्यास सुरुवात केली. तितक्यातच तिच्या गळ्यात असणारा नाजूक हार तुटला आणि तो पडणार असं वाटताच आलियानं अतिशय कमाल पद्धतीनं हात कानाच्या खाली, मानेपाशी नेत तिथंच नेकलेस धरला. जणू काही ती एखाद्या फोटोसाठीच पोझ देत आहे.
पुढे? पुढे काय... आलियानं हात तसाच ठेवत एकाहून एक अफलातून पोझ दिल्या. आपल्या लूकमधील एक महत्त्वाचा भाग फसला आहे, ही वस्तूस्थिती असतानाही आलियानं त्याचा कोणताही भाव चेहऱ्यावर आणला नाही. अर्ध्या सेकंदांहूनही कमी वेळात तिनं हा प्रसंग निभावून नेला आणि बी टाऊनची ही अभिनेत्री रेड कार्पेटवरून सर्वांच्याच मनाचा ठाव घेत पुढे निघून गेली.
खरंतर आलियाच्या या लूकचेच फोटो सर्वप्रथम सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर तिच्या या नेकलेस तुटतानाच्या क्षणांचे व्हिडीओ समोर आले, जिथं आलियाचा हा कमाल अंदाज प्रत्येकाचीच नजर रोखून धरताना दिसला. या व्हिडीओला असंख्यवेळा पाहिलं गेलं, चाहते त्यावर व्यक्तही झाले आणि पुन्हा एकदा आलियाप्रती चाहत्यांच्या मनात असणारं प्रेम अगदी ठळकपणे दिसून आलं.