Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिरसोबतच्या नात्याविषयी फातिमा म्हणते....

आमिर आणि फातिमाने आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 

आमिरसोबतच्या नात्याविषयी फातिमा म्हणते....

मुंबई : विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांमध्ये पाहता पाहता असं काही मैत्रीचं दृढ नातं तयार होतं, की या नात्याविषयी चर्चा रंगण्यास वेळ लागत नाही. सध्याच्या घडीला कलाविश्वात अशाच एका नात्याची चर्चा सुरु आहे. ती चर्चा म्हणजे 'दंगल फेम' अभिनेत्री फातिमा सना शेख आणि 'परफेक्शनिस्ट' आमिर खान यांची. 

गेल्या काही दिवसांपासून एकिकडे फातिमा आणि आमिरच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशाविषयी प्रतिक्रिया पाहायला मिळत असतानाच फातिमाचं नाव आमिरशी जोडलं जात आहे. या साऱ्यावर आता खुद्द फातिमानेच प्रतिक्रिया दिली आहे. 

'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी आपलं मत मांडलं. ही बाब अतिशय विचित्र असल्याचं ती म्हणाली. 'एक दिवस टीव्ही पाहताना आपला फोटो टीव्हीवर आला तेव्हा आईने तो मला दाखवला. पण, त्यावेळी जी बातमी सुरु होती ते पाहून माझं मन विचलित झालं. त्यावेळी स्वत:चीच समजूत काढावी असं मला वाटलं', असं तिने सांगितलं. 

तुमच्याविषयी कोणी असं काही बोलत असेल तर त्याविषयी  व्यक्त व्हावं लागतं. पण, आता मला इतरांना स्पष्टीकरण द्यावसं वाटत नाही, असं तिने स्पष्ट केलं. तुम्ही काहीही करा चर्चा व्हायच्या त्या होणारच. विषय चघळणं, त्यावर प्रतिक्रिया देणं, बोलत राहणं हे लोकांचं कामच आहे असं म्हणत मला त्याने काहीच फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया फातिमाने दिली. 

मुख्य म्हणजे आपल्याविषयी हे असंकाहीतरी लिहिणाऱ्यांपैकी बरेचजण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असल्याचंही तिने सांगितलं. त्यामुळे या साऱ्या प्रकाराने आपल्यावर काहीच प्रभाव पडत नसल्याच्याच भूमिकेवर ती ठाम आहे. आमिरसोबतच फातिमाचं नाव अपारशक्ती खुराना याच्याशीही जोडलं गेलं होतं. करिअरच्या सुरुवातीलाच तिच्याविषयी होणाऱ्या या चर्चा पाहता खरंच कलाकारांच्या खासगी आयुष्यावर आणि त्यांच्या मानसिक संतुलनावर या साऱ्याचा किती परिणाम होत असेल ही बाबरही लक्षात घेणं तितकच महत्त्वाचं आहे. 

 

Read More