Marathi News> मनोरंजन
Advertisement

मी यशस्वी नाही- राधिका आपटे

ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत...

मी यशस्वी नाही- राधिका आपटे

मुंबई : चौकटीबाहेरच्या भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अभिनेत्रींची संख्या हिंदी कलाविश्वात दिवसागणिक वाढत आहे. अमुक एका धाटणीचेच चित्रपट साकारण्यापेक्षा अभिनय कौशल्य आणखी खुलवण्याचाच प्रत्येक अभिनेत्रीचा अट्टहास असतो. अशीच आपलं वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. बोल्ड आणि बिनधास्त भूमिका ही राधिकाची ओळख. त्याला जोड मिळते ती म्हणजे तिच्या अभिनयाची. सध्याच्या घडीला यशस्वी अभिनेत्रींमध्ये राधिकाही गणली जाते. पण, यशाच्या तिच्या संकल्पना मात्र फारच वेगळ्या आहेत. यशाच्या वाटेवर चालत असतानाही आपण, यशस्वी नाही असंच तिचं म्हणणं आहे. 

'मोठ्या आणि नावाजलेल्या कलाकारांसोबत काम करायला मला आवडतं. मग ते पुरुष कलाकार असो किंवा महिला कलाकार.  माझ्यासाठी यशाच्या संकल्पना इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. कारण, मला नाही वाटत मी या टप्प्यावर यशस्वी आहे. कारण, ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्या मी अजूनही मिळवलेल्या नाहीत. मला आणखी यश संपादन करायचं आहे', असं राधिका पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने राधिका आपटे नावाची ही अभिनेत्री येत्या काळात आणखी अफलातून भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज आहे, असंच म्हणावं लागेल. 

राधिका लवकरच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत 'रात अकेली है' या चित्रपटातून झळकणार आहे. हनी त्रेहान दिग्दर्शित या चित्रपटासाठी आपण उत्सुक असल्याचंही तिने म्हटलं. 'नवाज हा एक उत्तम अभिनेता आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला आनंदच होत आहे. कारण, तो या भूमिकेसाठी एक चांगली निवड आहे. या चित्रपटात मीसुद्धा काही भन्नाट दृश्य साकारत आहे. मुळात चित्रपटाची स्क्रिप्टही तितकीच ताकदीची असल्यामुळे त्यावर काम करण्यात आनंच आहे', असं तिने सांगितलं. 

राधिका आणि नवाजच्या या आगामी चित्रपटाविषयी कलाविश्वातही उत्सुकता आहे. तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका पाहता आता कोणतं नवं आव्हान राधिका पेलणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. २००५ मध्ये 'वाह! लाईफ हो तो ऐसी...' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ज्यानंतर तिने साचेबद्ध चित्रपटांना शह देत 'पार्च्ड', 'फोबिया', पॅडमॅन', 'अंदाधुन' अशा चित्रपटांचा स्वीकार केला. 'लस्ट स्टोरिज', 'सेक्रेड गेम्स' अशा वेब सीरिजमधूनही राधिकाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. 

 

Read More