Shilpa Shetty Reaction On Marathi Hindi language: मीरा-भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली होती. मनसे कार्यकर्त्यांनी येऊन मराठीमध्ये बोलले पाहिजे असं म्हणत मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप व्यापाऱ्याने केला. त्यानंतर हे प्रकरण अधिकच तीव्र होत चाललं आहे.
दरम्यान, मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील उडी घेतली आहे. शिल्पा शेट्टीच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी मनसेच्या मारहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे. परंतु, शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया सध्या खूपच चर्चेत आली आहे.
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आगामी चित्रपट 'केडी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझर लॉन्चच्या कार्यक्रमाला शिल्पा शेट्टीने हजेरी लावली होती. यावेळी तिला पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. यामध्ये तिला मराठी-हिंदी वादावर देखील प्रश्न विचारण्यात आला. यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेमकं काय म्हणाली पाहूयात सविस्तर
शिल्पा शेट्टी म्हणाली, 'मी महाराष्ट्राची मुलगी आहे. पण, आज आपण केडी सिनेमाबद्दल बोलत आहोत. मात्र, तुम्ही या ठिकाणी असे प्रश्न विचारून मला या वादात ओढत असाल तर मी तसं करणार नाही. केडी चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आपण मराठीमध्ये देखील हा चित्रपट डब करू शकतो' असं ती म्हणाली.
'केडी-द डेव्हिल' चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या 'केडी-द डेव्हिल'या चित्रपटामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा 'केडी-द डेव्हिल'हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसह संजय दत्त, विजय सेतुपथी, नोरा फतेही आणि अमजाद कुरेशी हे कलाकार असणार आहेत.
शिल्पा शेट्टी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सौंदर्यासोबत ती तिच्या फिटनेसमुळे देखील प्रचंड चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.