Cinema News : हिंदी कलाजगतात आजवर अनेक अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनाता ठाव घेतला. सध्याच्या अभिनेत्री म्हणू नका किंवा गतकाळातील अभिनेत्री म्हणू नका. प्रत्येक चेहऱ्यानं प्रेक्षकांवर कमालीची जादू केल्याचं पाहायला मिळालं. याच अभिनेत्रींच्या यादीत एक नाव असं होतं जिला चाहत्यांनी डोक्यावर बसवलं मात्र, खासगी जीवनात सुखानं तिला कायमच चकवा दिला.
'परवाना', 'जोश', 'बेताब' अशा चित्रपटांतून लोकप्रियत झालेली आणि वैवाहिक जीवनातील अस्थैर्यानं ती पुरती कोलमडली, ही अभिनेत्री म्हणजे किशोर कुमार यांची तिसरी पत्नी आणि मिथून चक्रवर्ती यांची दुसरी पत्नी योगिता बाली. अभिनेत्री गीता बाली यांची भाची, अशीही योगिता बाली यांची ओळख. किशोर कुमार आणि योगिता बाली यांचं नातं फार काळ टीकू शकलं नाही. 1976 मध्ये या अभिनेत्रीनं वयानं 20 वर्षे मोठ्या असणाऱ्या गायक/ अभिनेत्याशी लग्न केलं होतं. मात्र या नात्यात फार कमी वेळात वादळ निर्माण झालं. योगिता यांच्यासाठी हे लग्न केवळ थट्टा होती असं खुद्द किशोर कुमार म्हणाल्याचं सांगितलं जातं.
'योगिता फक्त आईविषयीच बोलत होत्या. मला नाही वाटत तिनं माझ्याशी लग्न केलं किंवा ती माझ्यासोबत राहिली. ती फक्त आईविषयीच बोलत असायची', असं म्हणणाऱ्या किशोर कुमार यांच्यासोबत अभिनेत्रीचं नातं दोन वर्षांतच तुटलं. 1978 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
किशोर कुमार यांच्यासोबतचं नातं तुटल्यानंतर योगिता बाली यांचं नाव मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत जोडलं गेलं आणि त्यांनी 1979 मध्ये लग्न केलं. योगिता आणि मिथुन यांना 4 मुलं झाली. पण, योगिता यांच्याशी लग्नानंतर श्रीदेवीसोबत मिथुन चक्रवर्ती यांची जवळीत वाढली आणि या विश्वासघातापोटी योगिता यांनी आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला.
तिथं मिथुन चक्रवर्ती यांच्याशी नातं संपवून श्रीदेवीनं 8 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या बोनी कपूरशी लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. इथं योगिता यांनीसुद्धा कलाजगतापासून दुरावा पत्करत कुटुंबावर लक्ष केंद्रीत केलं. मिथुन यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्यानं अनेक चढ- उतार पाहिले मात्र आजही ही जोडी एकत्रच आहे. सध्याच्या दिवसांमध्ये योगिता बाली कलाविश्वाच्या झगमगाटापासून कैक मैल दूर असून कुटुंबाला प्राधान्य देत आहेत.