अभिनेता प्रकाश राज यांचं नाव बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत फार आदराने घेतलं जातं. त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमधील 'वॉन्टेड', 'सिंघम', 'दबंग 2', 'गोलमाल अगेन' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. यासह साऊथच्याही अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घातली आहे. अभिनयासह आपल्या रोखठोक भूमिकांसाठीही ते ओळखले जातात. भाजपा, नरेंद्र मोदींना विरोध करताना ते परखडपणे आपली भूमिका मांडतात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना ते अनेक मुद्द्यांना हात घालत सरकारला प्रश्न विचारतात.
नुकतंच 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश राज यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. आपल्या बॉलिवूड करिअरपासून ते राजकारण अशा सर्वच क्षेत्राबाबत त्यांनी भाष्य केलं. पण यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाबत आणि त्यांच्या संघर्षाबद्दल जे काही सांगितलं त्याने लक्ष वेधून घेतलं. आपल्या आईने लहानपणी खूप काही सहन केलं असं प्रकाश राज यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबाने नेहमी संघर्षच केला असंही त्यांनी सांगितलं.
प्रकाश राज यांनी सांगितलं की, "माझी आई 12 वर्षांची असतानाच अनाथ झाली होती. जेव्हा माझ्या आजीचं निधन झालं तेव्हा आजोबांकडे फार पैसे नव्हते. त्यांनी माझी आई आणि तिच्या दोन बहिणींना एका अनाथाश्रमात टाकून दिलं. तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. तिथे असतानाच त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला. यानंतर त्या एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करु लागल्या. काही काळानंतर त्या बंगळुरुत राहण्यास गेल्या. आयुष्याला नेमकं कशाप्रकारे सामोरं जायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांच्याकडे पैसे अजिबात नव्हते".
"शिकण्याची इच्छा नसल्याने माझे वडील मंजूनाथ राय मंगळुरु सोडून बंगळुरुला आले होते. ते तिथे बुक बायडिंगचं काम करत असत. माझ्या आई-वडिलांची रुग्णालयात भेट झाली होती. तिथेच दोघे प्रेमात पडले. यानंतर माझा जन्म झाला. पण माझ्या आयुष्यात फार संघर्ष होता. माझ्या आयुष्यात मी एखादी मोठी गोष्ट पाहिली असेल तर ती सायकल आहे," असं प्रकाश राज यांनी सांगितलं.
प्रकाश राज यांनी यादरम्यान आपल्या बालपणीचे किस्से सांगितले. आपण फार शांत होतो, ज्यामुळे आई नेहमी चिंतेत असायची अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यांनी सांगितलं की, "माझ्या बालपणीच्या आठवणी फार सुंदर आहेत. मी फार शांत मुलगा होतो. हा मुलगा आयुष्यात काही करु शकेल का अशी चिंता आईला सतावत असे. मी फार भोळा होते, पण माझी बहिण आणि छोटा भाऊ चालाख होते".
"मी 28 वर्षांचा झालो, तेव्हाही याच्याकडे काही काम नाही, फक्त नाटकात काम करत असो अशी तिला चिंता होती. हा आपल्या आयुष्यात काय करणार? ती देवाकडे प्रार्थन करायची की मला काम दे जेणेकरुन याची काळजी घेऊ शकेन. तिने फक्त माझीच चिंता केली. आता मी इतका यशस्वी झालो आहे, पण अजूनही तिचा विश्वास बसत नाही. ती इतकी साधी आहे की, तुम्ही जर तिला हे औषध हजार रुपयाचं आहे सांगितलं तर ती घेणार नाही," असं प्रकाश राज म्हणाले.