Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आशुतोष गोवारीकरने माझ्या हत्येची तयारी केली होती', जावेद अख्तर असं का म्हणाले? फार रंजक आहे किस्सा

Ashutosh Gowariker Birthday: जावेद अख्तर यांनी 'स्वदेस' चित्रपटातील 'राम तेरे मन मे है' गाणं लिहिलं आहे. हे गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे. पण या गाण्यामागील किस्सा तुम्हाला माहिती आहे का? जावेद अख्तर यांनी तर हे गाणं लिहिण्यास नकार दिला होता? पण का ते जाणून घ्या  

'आशुतोष गोवारीकरने माझ्या हत्येची तयारी केली होती', जावेद अख्तर असं का म्हणाले? फार रंजक आहे किस्सा

Ashutosh Gowariker Birthday: शाहरुख खानची मुख्य भूमिका असणारा 'स्वदेस' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करु शकला नव्हता. पण या चित्रपटाची गणना कल्ट चित्रपटांमध्ये केली जाते. आशुतोष गोवारीकरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात देशप्रेम, गरिबी, सामाजिक अशा अनेक मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं होतं. यासह या चित्रपटातील 'राम तेरे मन मे है' गाणंही प्रेक्षकांना तितकंच आवडलं होतं. जावेद अख्तर यांनी हे गाणं लिहिलं होतं. पण या गाण्यामागील किस्सा तुम्हाला माहिती आहे का? आशुतोष गोवारीकरने आपल्या हत्येचा कट आखला होता असं जावेद अख्तर यांचं म्हणणं होतं. 

जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमात हे गाणं लिहिताना त्यांनी किती घाम फुटला होता हा किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितलं होतं की, "मला आशुतोष गोवारीकरचा तुम्ही लवकर या फार अर्जंट आहे असा मेसेज आला होता. ते त्यावेळी साताऱ्यातील वाई येथे 'स्वदेस' चित्रपटाचं शूट करत होते. वाईचं एक वेगळं महत्त्वं आहे. तिथे त्यांनी मंदिर, घाट वैगेरे उभं केलं होतं. मी पुण्यातून साताऱ्याला गेलो. तिथे स्वदेस चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं. मी शुटिंग वैगेरे पाहिल्यानंतर हॉटेलमध्ये गेलो. संध्याकाळी आशुतोष गोवारीकर माझ्या रुममध्ये आला. त्याने सांगितलं की, ए आर रहमान परवा जाणार आहे. इंग्लंडला तीन महिन्यांसाठी एका कार्यक्रमासाठी तो जाणार आहे. मला त्याआधी याच गावात एक गाणं शूट करायचं आहे. आम्ही हॉटेल रुमधील एका रुमला रेकॉर्डिंग रुम केलं आहे. एक गायक तिथे येणार आहे. रहमान सकाळी येत आहे आणि रात्री गाणं रेकॉर्ड करणार आहे. ही ट्यून आहे, तुम्ही गाणं लिहा". 

"तसं मला गाणं लिहिण्यात काही समस्या नसते. जास्तीत जास्त 1 ते 2 तासात गाणं लिहून काढतो. मी म्हटलं उद्या रात्री रेकॉर्डिंग होणार आहे तर सहजपणे लिहून होईल. नंतर मी विचारलं गाण्यातील परिस्थिती काय आहे. त्यावर आशुतोषने सांगितलं की गावात रामलीला होत आहे, सीता अशोक वाटीकेत आहे. रावण येऊन सीतेला विचारतो रामात असं काय आहे की त्याची पूजा करतेस? त्यावर सीता उत्तर देते. त्यानंतर रावण मग तो वाचवण्यासाठी का आला नाही? असं विचारतो. हे सगळं प्रश्नोत्तराच्या स्वरुपात आहे. मी म्हटलं शाबास, माझ्या हत्येची अगदी योग्य योजना आखली आहे," असं त्यांनी सांगितलं. 

"मला सांगितलं असतं तर मी दोन, तीन पुस्तकं आणली असती. रामचरित्र मानस वैगेरे आणलं असतं आणि या स्थितीत काय लिहिलं आहे हे वाचलं असतं. मी हे लिहू शकत नाही. हे फार संवेदनशील आहे असं मी त्याला सांगितलं. अयोध्येतून ते जात आहेत अशी काही स्थिती असती तर मला समजलंही असतं. पण तुम्ही तर इथे तुम्ही रावण आणि सीतेमधील संभाषण दाखवत आहात. त्यावर त्याने काही होत नाही, तुम्ही लिहाल असं म्हटलं आणि निघून गेला. मी रात्री 1.30, 2 वाजल्याशिवाय झोपत नाही. पण त्या रात्री घाबरुन 9 वाजताच झोपलो," अशी आठवण त्यांनी सांगितली. 

"पहाटे 5.30 वाजता मला जाग आली. समोर कॅसेट आणि पेपर ठेवला होता. मी म्हटलं तीन, चार लाईन लिहायच्या आणि पुढे जमलं नाही असं सांगायचं. पण दीड तासाने माझ्या लक्षात आलं की मी सगळं गाणं लिहून काढलं आहे. हे लोक आले, मी ऐकवलं, त्यांना आवडलं आणि त्या रात्री रेकॉर्डही झालं. चित्रपटात हे गाणं वापरण्यात आलं. पण खरा ट्विस्ट पुढे होता. म्युझिक रिलीज झालं तेव्हा तिथे काही विद्वान लोक आले होते. रामचरित्र मानस, रावण हे त्यांनी वाचलं होतं. एका व्यक्तीने म्हटलं की, तुम्ही कमाल केली. तुलसीदास यांचा युक्तिवाद तुम्ही ज्या प्रकारे वापरला आहे तो कमाल आहे. पण मला आजपर्यंत त्याबद्दल समजलं नाही," असं जावेद अख्तर यांनी सांगितलं. 

नंतर ते म्हणाले की, "लखनऊमध्ये रामलीला, कृष्णलीला फार होत असे. आम्ही 8, 9 वर्षांचे असताना त्यात जाऊन बसायचो. त्यावेळी मी हे ऐकलं होतं का? जे माझ्या लक्षात होतं पण आठवत नव्हतं. आणि तेच पेररवर आलं. नेमकं काय झालं हे मला माहिती नाही. मी कधी ऐकलं होतं, लक्षात होतं नव्हतं काही माहिती नाही. पण गाणी लिहिण्याच्या बाबतीत माझ्या आयुष्यातील फार अजब प्रसंग आहे". 

Read More