Bollywood Movies : हिंदी कलाजगतामध्ये असंख्य दिग्दर्शक आणि असंख्य कलाकारांनी त्यांच्या परिनं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या हेतूनं अनेक सीमा ओलांडत बहुविध चित्रपट साकारले. या कलाकारांनी कधी प्रेक्षकांना आनंद दिला, कधी त्यांनाच भावूकही केलं. मुळात या प्रेक्षकांनी कलाकारांना मोठंही केलं आणि क्षणात त्यांना प्रसिद्धीझोतापासून दूरही नेलं. याच कारणास्तव, 'इंडस्ट्री, फिल्मलाईन एक जुआ है' असंच या क्षेत्रात काम करणारे बरेचजण म्हणतात. असाच जुगार खेळला गेला होता एका अशा चित्रपटावर ज्यामध्ये खऱ्या जीवनातील पिता-पुत्राची जोडी झळकली होती.
23 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटाला का कोण जाणे, पण वितरक मिळत नव्हते. पण, जेव्हा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा अवघ्या 10 कोटींच्या निर्मितीखर्चात साकारलेल्या या चित्रपटानं 33 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आणि आजपर्यंत त्याचे कलाकार, निर्माते मालामाल होताना दिसले. ज्यांनी हा चित्रपट चालणारच नाही अशा पैजा लावल्या ते खऱ्या अर्थानं तोंडावर पडले, कारण या कथानकाला इतकी लोकप्रियता मिळवली की त्याचा दुसरा भागही आला आणि तोसुद्धा तितकाच लोकप्रिय ठरला. इतकंच काय तर, आजसुद्धा ओटीटी आणि युट्यूबवर सिनेरसिक वारंवार हा चित्रपट पाहतात.
विधू विनोद चोप्रा यांच्या निर्मितीसंस्थेतून साकारलेला आणि अनेक वितरकांनी नाकारलेला हा चित्रपट होता 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai MBBS). हल्लीच एका मुलाखतीदरम्यान चोप्रा यांनी या चित्रपटाचं वास्तव सर्वांसमोर आणत खऱ्या अर्थानं संजय दत्त, अर्शद वारसी, सुनिल दत्त, बोमन इरानी आणि सहकलाकारांच्या भूमिका असणाऱ्या या कलाकृतीनं आपल्याला श्रीमंत बनवल्याचं सांगितलं.
विधू विनोद चोप्रा यांच्या माहितीनुसार मुंबईबाहेर या चित्रपटाला खरेदी केलं नव्हतं. दक्षिण भारतात त्यांचा एक वितरक होता, ज्यानं हा चित्रपट 11 लाखांना खरेदी केला होता. तो चित्रपट प्रदर्शित होण्याच्या चार दिवस आधी आला आणि त्यानं चित्रपट पाहताच प्रतिक्रिया दिली, 'सर हा सिनेमा एक दिवसही चालणार नाही, मुंबईबाहेर कोणालाच मुन्नाभाईची भाषा समजणार नाही', असं तो म्हणाला होता.
प्रत्यक्षात मात्र वेगळं घडलं आणि बॉक्स ऑफिसवर 23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडलं. त्याचं कथानक, कलाकारांचा अभिनय, इतकंच काय तर गाणीसुद्धा लोकप्रिय झाली. अनेकांनीच 'मुन्नाभाई' स्टाईलमध्ये शर्ट वापरण्यास सुरुवात केली, तर कुणी 'सर्किट'सारखी हेअरस्टाईल केली. तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट? कमेंटमध्ये कळवा...