IPS Officers at Aamir Khan Residence: बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरी पोलीस आणि आयपीएस अधिकारी दाखल झाल्याची चर्चा रंगली आहे. आमिर खानच्या घरातून पोलिसांची गाडी आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी भरलेली बस बाहेर निघताना दिसली होती. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत नेमकं काय झालं होतं याबाबत वेगवेगळे अंदाज लावण्यास सुरुवात केली होती. अखेर आमिर खानच्या घरी येण्यामागे नेमकं काय कारण होतं अशी विचारणा करत अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 25 आयपीएस अधिकारी होते. मात्र आता खरं कारण समोर आलं असून आमिर खानच्या टीमने सत्य सांगितलं आहे. टीमने नेमकी संख्या सांगितली नसली तरी सर्वांची आमिरला भेटण्याची इच्छा होती असं सांगितलं आहे.
आमिर खानच्या घरी आयपीएस अधिकाऱ्यांनी भरलेली बस येण्यामागील कारण समोर आलं आहे. आमिर खानच्या टीममधील एका सदस्याने सांगितलं आहे की, "या बॅचचे आयपीएस प्रशिक्षक आमिरला भेटू इच्छित होते. यामुळेच आमिर खानने त्यांना निमंत्रित केलं होतं आणि भेट घेतली".
एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये लक्झरी बसमध्ये बसलेले अनेक आयपीएस अधिकारी आमिर खानच्या इमारतीत जाताना दिसले. यानंतर उलट-सुलट चर्चांना उधाण आलं होतं. आमिर खान अशा एकदा प्रोजेक्टमध्ये गुंतला असावा ज्यामध्ये मोठ्या सुरक्षेची गरज आहे अशीही चर्चा रंगली. ही भेट अशावेळी झाली आहे, जेव्हा आमीर खानच्या लक्झरी गाड्यांसंबंधी बातम्या येत आहेत. आधीच आमिरची टीम यामुळे चिंतेत असताना ही भेट झाली आहे.
आमिर खान मागील अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या आयपीएस प्रशिक्षकांची भेट घेत असतो. खासकरुन 1999 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या सरफरोश चित्रपटानंतर अनेक आयपीएस अधिकारी त्याला भेटण्यास उत्सुक असतात. या चित्रपटात त्याने आयपीएस अधिकाऱ्याची निभावलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
नुकताच आमिर खानचा 'सितारे जमीन पर' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आमीर खान अनेकांसाठी या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 165 कोटींची कमाई केली आहे. आमिर खान लवकरच त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे.
चित्रपटासंदर्भात बोलायचं गेल्यास आमिर खान 'कुली' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रजनीकांत प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय लोकेश कनंगराजसोबतही काम करणार आहे.
दरम्यान, 2025 च्या मेलबर्नमधील भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFM) प्रमुख पाहुणा म्हणून आमिर उपस्थित राहणार आहे. 14 ते 24 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात आमिरच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला जाईल.