Chhaava Box Office Collection: विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला छावा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. छावा सिनेमाने या वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. छावा चित्रपटाने 2025मध्ये 500 कोटींचा पार करणारा पहिला सिनेमा ठरला आहे.
छावाने पहिल्या आठवड्यातच 225.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी रुपयांची कमाई करुन 22 व्या दिवशी 6.33 कोटींचे कलेक्शन करुन एकूण 502.70 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाने 23 व्या दिवशी 6.4 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळं सिनेमाने 509.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे चौथा यशस्वी आठवडा आहे. विकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करु शकतो.
विक्की कौशलचा छावा ज्या प्रकारे बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे त्यानुसार लवकरच सिनेमा गदर-2चा रेकॉर्ड मोडू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. गदरने 2023मध्ये 525.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. इतकंच नव्हे तर छावा आणखी काही दिवस सिनेमागृहात राहिला तर शाहरुख खानच्या पठाण सिनेमालाही मागे टाकू शकतो. शाहरुख खानच्या सर्वात मोठ्या सिनेमाला मागे टाकण्यासाठी छावाला आणखी 30 कोटींची कमाई करण्याची गरज आहे.
लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा सिनेमाचे 130 कोटी इतके बजेट होते. विक्की कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर, पत्नी रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, "छावा" चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. "छावा" चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणुन विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकर उपस्थित होते. उदय सामंत यांच्या ट्विटनंतर छावा मराठी भाषेत प्रदर्शित झाल्यास या चित्रपटालाही भरभरून प्रतिसाद मिळेल, यात काही शंका नाही.