Marathi News> मनोरंजन
Advertisement

'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता म्हणतो, 'आता किमान लोक तुझं नाव काय? हे विचारणार नाहीत'

Chhaava Movie : आता लोक किमान ओळख तरी विचारणार नाहीत; 'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता असं का म्हणाला?   

'छावा'चं यश पाहून कवी कलश साकारणारा अभिनेता म्हणतो, 'आता किमान लोक तुझं नाव काय? हे विचारणार नाहीत'

Chhaava Movie : 2025 हे वर्ष खऱ्या अर्थानं अभिनेता विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि 'छावा' या चित्रपटातील सर्वच कलाकारांसाठी एक असामान्य वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूडवर जणू वादळाच्याच स्वरुपात धडकलेल्या या चित्रपटाला मिळणारी प्रसिद्धी पाहता असं म्हणणं गैर ठरणार नाही. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्या क्षणापासून अगदी आतापर्यंत म्हणजे जवळपास आठवडाभराचा काळ उलटला तरीही 'छावा'च्या कमाईचा विजयरथ थांबलेला नाही. किंबहुना त्याचा वेगही मंदावलेला नाही. 

छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तीरेखा साकारत त्यांच्या बलिदानाला रुपेरी पडद्याच्या माध्यमातून 'छावा'च्या संपूर्ण टीमनं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. या चित्रपटातील प्रत्येक दृश्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि त्यातही विशेष गाजला तो म्हणजे कवी कलश- छत्रपती यांच्यात झालेला भावनिक संवाद. 

अभिनेता विनीत कुमार यानं या चित्रपटामध्ये कवी कलश यांची व्यक्तिरेखा साकारली असून, जीवाला जीव देणारा मित्र कसा असावा याचीच महती या भूमिकेच्या माध्यमातून त्यानं दाखवून दिली आहे. ही व्यक्तीरेखा साकारत असताना त्याचं कवीता सादर करणं, आवाजात भावनांचं वर्चस्व दाखवून देणं या संपूर्ण शैलीनं प्रेक्षकांवर विनीतचीसुद्धा तितकीच भुरळ पडली आहे. आपण साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांचं आणि चित्रपट समीक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून विनीत कुमार सिंह प्रचंड भावूक झाला. त्यानं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या लोकप्रियतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रेक्षकांच्या प्रेमाचे आभार मानले. आता प्रेक्षकांना आपलं नाव लक्षात राहील अशी आशाही त्यानं व्यक्त केली. 

हेसुद्धा वाचा : Chhaava Movie BTS Video : घाम गाळला, रक्तही सांडलं; विकी कौशलनंच सांगितलं, कसा साकारला 'छावा'

 

चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला मिळालेल्या संधीप्रती कृतज्ञ भाव मांडताना विकीनं मनातील सर्वच भावनांना वाट मोकळी करून दिली. 'चाहत्यांसाठी.... तुमचे मेसेज इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर येणारी प्रतिक्रिया पाहून मी आनंदी आणि भावूक होतो. छावानंतर मला विश्वास आहे की ज्यांनी माझं संपूर्ण काम पाहिलंय आणि माझ्यावर प्रेम केलंय ते मला, ''सर वाईट वाटणार नसेल तर एक विचारू, तुमचं नाव काय?'' या प्रश्नानं आश्चर्यचकित करणार नाहीत', असं त्यानं लिहिलं. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रेक्षकांच्या मनापासून आलेल्या प्रतिक्रिया पाहून आपण नि:शब्द आहोत असंही विनीतनं या कृतज्ञतापूर्ण पोस्टमध्ये म्हटलं. 

Read More