Chinki-Minki Pair BrokeUp: 27 डिसेंबर 1998 रोजी नोएडामध्ये जन्मलेल्या या जुळ्या बहिणी सुरभि आणि समृद्धीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. त्यांच्या हुबेहूब दिसण्यामुळे लोकांना त्यांना ओळखणं कठीण जायचं आणि हाच त्यांचा खास गुण बनला. दोघी शिक्षणासोबतच सोशल मीडियावरही सक्रीय राहिल्या. त्यांनी इंटरनेटवर आपली वेगळीच ओळख निर्माण केली.
टिकटॉक ते कपिल शर्मा शो
चिंकी-मिंकीने त्यांच्या प्रवासाची सुरुवात टिकटॉक या अॅपवर व्हिडीओ बनवून सुरुवात केली. एकसारखे कपडे आणि हावभाव दाखवत मजेशीर व्हिडीओ करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, काही काळानंतर टिकटॉक या अॅपवर बंदी आल्याने हळूहळू त्यांनी इन्स्टाग्रामवर लोकप्रियता मिळवण्यास सुरुवात केली. लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांना अनेक शो मधून ऑफर येऊ लागल्या. जून 2019 मध्ये त्या पहिल्यांदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये झळकल्या. तिथे 'पिया-पिया ओ पिया' गाण्यावर त्यांच्या नृत्याने आणि दोघींच्या एकत्र बोलण्याच्या स्टाइलने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यांनी या शोमधील अनेक एपिसोडमध्ये आपली उपस्थिती दाखवली.
नवा निर्णय आणि चाहत्यांचा धक्का
3 जुलै 2025 रोजी त्या दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या व्यावसायिक वेगळेपणाची घोषणा केली. त्यांनी कोणतेही ठोस कारण दिले नाही, पण दोघींनाही आता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'आपण एकत्र एक सुंदर प्रवास केला, पण आता स्वतःची ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे. हा निर्णय सोपा नव्हता, पण आवश्यक होता. आम्हाला एकमेकांविषयी नेहमीच प्रेम आणि आदर असेल. आशा आहे की तुम्ही आमच्या या नव्या प्रवासातही आम्हाला साथ द्याल.'
लोकप्रियतेचा प्रवास
चिंकी-मिंकीने 'द कपिल शर्मा शो' व्यतिरिक्त अनेक कॉमेडी शो आणि फॅशन इव्हेंट्समध्ये एकत्र सहभाग घेतला. सोशल मीडियावर त्यांनी ब्रँड प्रमोशन्स आणि यूट्यूब व्लॉग्समधूनही कोटींची कमाई केली. त्यांच्या इन्स्टाग्रामवर करोडो फॉलोअर्स आहेत, यूट्यूबवरही लाखो सबस्क्राइबर्स मिळवले. चाहत्यांना ही जोडी प्रचंड आवडली होती. मात्र, आता या दोघी वेगळ्या झाल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेक चाहते त्यांचा या निर्णयावर दुःखी झाले आहेत. तर काही त्या दोघींना त्यांचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.