Abhishek Upmanyu Trolled: स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यूला पाकिस्तानी सोशल मीडिया युजरचं समर्थन केल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानातील एका सोशल मीडिया युजरने पोस्ट केलेल्या टिप्पणीला सहमती दर्शविल्यानंतर अभिषेक भारतीय सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आहे. त्या पोस्टमध्ये "पश्चिमेकडे तुम्ही ज्या सर्व वंशवादाचा सामना करत आहात त्याला तुम्ही पात्र आहात," असं विधान करण्यात आलं होतं. अभिजित अय्यर मित्रा या युजरने एक्सवर सीमेपलीकडील महिलांसाठी अपमानास्पद नोट पुन्हा पोस्ट केल्यानंत हा गोंधळ सुरू झाला.
यावर व्यक्त होताना पाकिस्तानमधील सोशल मीडिया युजर @lilmisskhawaja ने पोस्ट करत भारतावर टीका केली. पश्चिमेकडे तुम्ही ज्या सर्व वंशवादाचा सामना करत आहात त्याला तुम्ही पात्र आहात असं तो युजर म्हणाला. यानंतर अभिषेकने पाकिस्तानी युजरच्या पोस्टला लाईक केलं आणि 'हो' अशी कमेंटही केली. यानंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. अभिषेक उपमन्यूला इतकं ट्रोल केलं जात आहे की, त्याने आपलं एक्स अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं आहे.
अभिषेक उपमन्यू हा एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळते. त्याचे इंस्टाग्रामवर 2.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर 5.26 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. उपमन्यूला "ऑन एअर विथ एआयबी" या लोकप्रिय कॉमेडी शोसाठी लेखक म्हणून ओळख मिळाली. आपल्या वेगळ्या शैलीने त्याने स्टँडअप कॉमेडी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पोस्टला उत्तर देताना, @lilmisskhawaja या अकाउंट नावाच्या पाकिस्तानी युजरने लिहिलं की, “झिरो क्लास. गैरवर्तन म्हणजे विनोद नाही. संपूर्ण जग तुमच्या देशाला बलात्काऱ्यांचं केंद्र म्हणून पाहते आणि ते योग्यच आहे. सामान्य भारतीयाच्या मते हे 'मजेदार' आहे. पश्चिमेकडे तुम्ही ज्या सर्व वंशवादाचा सामना करत आहात त्याला तुम्ही पात्र आहात”.
त्यानंतर काही वेळातच, अभिषेकने त्याखाली "हो" असे उत्तर दिले, ज्यामुळे तो त्याच्या मताशी सहमत असल्याचं दिसत होतं. वाद वाढल्यानंतर अभिषेकने अधिकृत अकाऊंट बंद केलं आहे.