Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ऑपरेशन सिंदूर'वर चित्रपट बनवण्यासाठी स्पर्धा; नावाच्या पेटंटसाठी 15 निर्मात्यांमध्ये वाद

India Pakistan War:भारतीय हवाई दलाच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे केवळ सीमा रेषेवर नाही, तर बॉलिवूडमध्येही एक प्रकारचे युद्ध सुरू झाले आहे. बॉलिवूडमधील 15 हून अधिक निर्माते आणि दिग्दर्शकांनी या घटनेवर चित्रपट तयार करण्यासाठी अर्ज केले आहेत.

'ऑपरेशन सिंदूर'वर चित्रपट बनवण्यासाठी स्पर्धा; नावाच्या पेटंटसाठी 15 निर्मात्यांमध्ये वाद

Operation Sindoor: भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या या कारवाईवर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी अनेक स्टुडिओंमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे शीर्षक मिळवण्यासाठी 'टी-सीरीज', 'झी स्टुडिओज', 'महावीर जैन फिल्म्स', मधुर भांडारकर, अशोक पंडित यांच्यासह एकूण 15 हून अधिक निर्माते आणि दिग्दर्शकांनी अर्ज केले आहेत.

ऑपरेशनची पार्श्वभूमी
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या क्रूर घटनेनंतर भारत सरकारने तातडीने निर्णय घेत, 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. रात्रीच्या वेळी हवाई दलाच्या विशेष युनिटने 25 मिनिटांच्या काळात 24 अचूक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांच्या गुप्त तळांचा समावेश या कारवाईत होता. या ऑपरेशनमध्ये सुमारे 70 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, 60 जण जखमी झाले आहेत.

बॉलिवूडमध्ये देशभक्तीच्या लाटेचा परिणाम
'उरी: द सर्जिकल स्ट्राईक', 'शेरशाह', 'राजी', 'बॉर्डर' अशा चित्रपटांनी देशभक्ती आणि लष्करी धाडस यांचे वास्तववादी चित्रण करून बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आहे. त्यामुळेच 'ऑपरेशन सिंदूर'सारख्या थरारक आणि देशासाठी महत्त्वाच्या घटनेवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.

काय म्हणाले FWICE अध्यक्ष?
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी सांगितले, 'आम्हाला 15 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. यात अनेक नामांकित प्रोडक्शन हाऊसचा समावेश आहे. लवकरच समिती एकत्र येऊन शीर्षक कोणाला दिले जावे याचा निर्णय घेईल. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ठेवण्यावर भर दिला जाईल.'

हे ही वाचा: पाकिस्तानला गिफ्ट म्हणून रवीना टंडनच्या नावाचं मिसाइल! ऑपरेशन सिंदूरनंतर 'तो' फोटो व्हायरल

मधुर भांडारकर आणि अन्य निर्मात्यांची योजना
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सांगितले की, 'हे केवळ एक युद्ध नव्हते, तर भारतीय लष्कराचे संयम, अचूक नियोजन आणि देशभक्ती यांचे प्रतीक आहे. मी यावर चित्रपट तयार करून जनतेसमोर हे वास्तव आणू इच्छितो.' काही निर्मात्यांनी ऑपरेशनमध्ये सहभागी जवानांच्या कुटुंबीयांच्या मुलाखती घेण्यास सुरुवातही केली आहे. जेणेकरून चित्रपटात अधिक प्रामाणिकपणा येईल.

शीर्षक नोंदणीच्या कायदेशीर अडचणी
चित्रपटाच्या शीर्षक नोंदणीसाठी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA), द फिल्म रायटर्स असोसिएशन (FWA) आणि स्क्रीन रायटर्स असोसिएशन (SWA) यांच्याकडे स्वतंत्र अर्ज केले जातात. एकाच शीर्षकासाठी अनेक अर्ज असल्यास, कोणती संस्था प्रथम नोंदणी करते आणि कोणत्या निर्मात्याकडे संकल्पना विकसित करण्याचे योग्य पुरावे आहेत, हे पाहून निर्णय घेतला जातो. 

Read More