Ajit Pawar On Saiyaara: बॉलीवूडमध्ये सध्या एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सैयारा’ चित्रपटात अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात जगभरात तब्बल 281 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘सैयारा’ चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी ‘आशिकी 2’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’सारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. प्रेमकथा, भावनिक संघर्ष आणि थरारक दृश्यांनी सजलेला ‘सैयारा’ प्रेक्षकांच्या हृदयाला भिडत आहे.
'सैयारा'मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळेना
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अनेकांनी मराठी चित्रपट 'येरे येरे पैसा 3' चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. सोशल मीडियावर 'सैयारा' चित्रपट पाहून अनेक तरुण-तरुणी रडताना दिसत आहेत.
सध्या या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून अनेक मल्टिप्लेक्सवाल्यांनी स्क्रीन वाढवल्या आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या स्क्रीन कमी करण्यात आल्या असून अनेक ठिकाणी मराठी चित्रपटांसाठी स्क्रीनला नकार देण्यात येत आहे.
मराठी चित्रपटांच्या स्क्रीनबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, 'सैयारा' चित्रपटामुळे 'येरे येरे पैसा 3' ला स्क्रीन मिळत नसल्याचा आरोप होत आहे. यावर मनसे देखील आक्रमक झाली आहे. अशातच याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारताच त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, मी तुम्हाला सांगू इच्छतो की, जर चित्रपट खास असेल तर प्रेक्षक चित्रपटांना प्रचंड गर्दी करतात.
आमच्या काळात देखील दादा कोंडकेंचे सात की आठ चित्रपट सिल्व्हर जुबिली ठरले. त्यामुळे ज्या चित्रपटाची स्टोरी चांगली आहे त्यालाच प्रेक्षक गर्दी करणार. त्यामुळे त्यांच्यावर आपण बळजबरी करू शकत नाही. जर एखाद्याला चित्रपट आवडत नसेल तर त्यांच्यावर आपण बळजबरी करू शकत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
'सैयारा'चा बॉक्स ऑफिसवर जलवा
'सैयारा' फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर चाहत्यांच्या मनातही तितकाच मजबूत ठसा उमटवत आहे. चित्रपटाचे गाणे, अभिनय आणि कथानक यामुळे तो सुपरहिट ठरत आहे. असं चित्रपट समीक्षकांचे म्हणणं आहे. त्यामुळे हा चित्रपट 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.