90 च्या दशकात दिग्दर्शक यश चोप्रा अन् समोर श्रीदेवी यांच्यासारखी मोठी अभिनेत्री असणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी स्वप्नवत असंच पदार्पण होतं. अनेक अभिनेत्यांसाठी ही संधी म्हणजे यशस्वी करिअरची जणू काही पायाभरणीच होती. पण एका अभिनेत्यासाठी मात्र इतक्या सगळ्या गोष्टी जुळून येणंही कमनशिबीच ठरलं. दीपक मल्होत्रा हा एक यशस्वी मॉडेल होता, पण अभिनेता म्हणून त्याच्या नशिबात यश लिहिलंच नव्हतं. यश चोप्रा यांनी लमहे चित्रपटात श्रीदेवीसह त्याला मुख्य भूमिकेसाठी निवडलं होतं. या चित्रपटानंतर यश आणि स्टारडम त्याच्या पायाशी लोळेल अशी अपेक्षा होता. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला पूर्णपणे नाकारलं.
बंगळुरूमध्ये जन्मलेल्या दीपक मल्होत्राने 80 च्या दशकाच्या मध्यात प्रिंट आणि रॅम्प मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. दशकाच्या अखेरीस, तो बंगळुरूमध्ये सर्वात जास्त मागणी असलेला पुरुष मॉडेल बनला होता. संपूर्ण देशभरात त्याची चर्चा रंगली होती. विमलचा चेहरा म्हणून, त्याने 1987 मध्ये 1.5 लाख रुपये घेतले. यासह तो देशातील सर्वाधिक मानधन घेणारा मॉडेल ठरला होता. त्याच काळात त्याला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. दीपकने काळजीपूर्वक निवड केली आणि यश चोप्रा यांच्या 'लम्हे' या रोमँटिक चित्रपटाला होकार दिला.
लम्हे चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्यासोबत वहिदा रहमान आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत होते. श्रीदेवीने या चित्रपटात आई आणि मुलगी (पल्लवी आणि पूजा) अशी दुहेरी भूमिका साकारली होती. दीपकला पल्लवीचा प्रियकर आणि पतीच्या भूमिकेत होता. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. समीक्षकांनी दीपकच्या अभिनय आणि पडद्यावरच्या उपस्थितीवर टीका केली. यासाठी एक सीन कारणीभूत ठरला होता.
या सीनमध्ये श्रीदेवी बेशुद्ध असताना दीपक तिला जागं करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी तो ज्याप्रकारे 'पल्लो' उच्चार करतो, तो विनोदाचा भाग झाला आहे. गेल्या काही वर्षात तर त्यावर मीम्सही तयार झाले आहेत.
लम्हे प्रदर्शित होण्यापूर्वीच यश चोप्रा यांनी दीपकला त्यांच्या पुढील 'डर' चित्रपटासाठी निवडलं होतं. पण लम्हे चित्रपटातील त्याच्या अभिनयाला मिळालेल्या प्रतिक्रियेनंतर, त्यांनी त्याच्या जागी सनी देओलला घेतलं. यासह दीपकने बेखुदी, सूर्यवंशी आणि जुनून हे चित्रपटही गमावले. 1991 मध्ये, त्याला शाहरुख खान आणि आमिर खानसारख्या तरुण अभिनेत्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जात होतं. 1993 पर्यंत त्याच्याकडे एकही ऑफर नव्हती. त्यावर्षी, दीपकने अभिनयाला रामराम ठोकला आणि अमेरिकेत गेला. तिथे त्याला मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट मिळाले. लम्हे व्यतिरिक्त त्याचा एकमेव चित्रपट म्हणजे एन चंद्राचा तेजस्विनी, जोदेखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.
1994 मध्ये न्यू यॉर्क शहरात स्थायिक झाल्यानंतर, दीपकने त्याचे नाव बदलून डिनो मार्टेली असं ठेवलं. त्याने मॉडेलिंग सुरू ठेवलं. यासह औद्योगिक अभियांत्रिकी आणि डिझायनिंगचाही अभ्यास केला. 2018 मध्ये, त्याने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड स्थापन केला आणि सध्या तो त्याचा प्रमुख म्हणून काम करतो. त्याने फॅशन कोरिओग्राफर लुबना अॅडमशी लग्न केले. तो आता पत्नी आणि दोन मुलांसह न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे.