Marathi News> मनोरंजन
Advertisement

MOVIE REVIEW : 'छपाक'मध्ये दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज नसला तरी...

ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे करण्यात यशस्वी होतो

MOVIE REVIEW : 'छपाक'मध्ये दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज नसला तरी...

चित्रपट : छपाक

कलाकार : दीपिका पदुकोण, विक्रांत मेस्सी, मधुरजीत, अंकित बिष्ट

दिग्दर्शक : मेघना गुलजार

निर्माता : फॉक्स स्टार स्टुडिओज, दीपिका पदुकोण, गोविंद सिंह संधू आणि मेघना गुलजार

वेळ : १२० मिनिटे

नवी दिल्ली : 'उन्होंने मेरी सूरत बदली है...मेरा मन नहीं', चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडल्यानंतरही हा डायलॉग तुमच्या मनात नक्कीच घोळत राहील... आणि याचमुळे हा सिनेमा यशस्वी ठरतो. १० जानेवारी रोजी 'छपाक' प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे करण्यात यशस्वी होतो. लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण  (Deepika Padukone) दिसते. दर्शकांना पसंत पडेल अशा पद्धतीनं मेघना गुलजार यांनी लक्ष्मीची कहाणी प्रेक्षकांसमोर आणलीय.

काय आहे सिनेमाचं कथानक?

या सिनेमाची कथा 'मालती' नावाच्या मुलीभोवती फिरतेय. मालती... एक साधी मुलगी, जिनं हजारो स्वप्न पाहिलीत आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दही तिच्या मनात आहे. तिला पुढे जायचंय, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी भरीव करायचंय... पण उडण्याची स्वप्न पाहणाऱ्या मालतीच्या पंखावर ऍसिड हल्ल्याचं सावट पडतं आणि तिचं आयुष्य वेगळंच वळण घेतं... ऍसिड हल्ल्यानंतर तिचं मालतीचे सगळी स्वप्न धुळीला मिळतात, आत्मविश्वास खच्ची होतो... 

परंतु, या दरम्यान मालतीची भेट एका पत्रकाराशी - अमोलशी होते. अमोलच्या भूमिकेत विक्रांत मेस्सी दिसतो. अमोल ऍसिड हल्ला पीडितांना मदत करणाऱ्या, त्यांना उपचारासाठी मदत करणारी एक एनजीओशी निगडीत आहे. या कामामध्ये तो मालतीलाही सहभागी करून घेतो. एनजीओमध्ये दाखल झाल्यानंतर मालतीची कायदेशीर लढाई सुरू होते. या लढाईत तिला आणखी दोघांची मदत मिळते. इथे तिला एक वेगळी ओळखही मिळते... आणि त्याचमुळे ती लोकांची प्रेरणास्रोतही बनते.

कलाकार आणि भूमिका

दीपिकानं ऍसिड हल्ला पीडितांची दु:ख, त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर कष्टानं उभा केलेला दिसतो. दीपिकाचा ग्लॅमरस अवतार सिनेमात कुठेही पाहायला मिळणार नाही परंतु, तरीदेखील ती प्रेक्षकांच्या लक्षात राहील. सिनेमात विक्रांत मेस्सीदेखील प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतो.

दिग्दर्शक मेघनाचं यश

तलवार, राजी आणि आता छपाक... दिग्दर्शक मेघना गुलजारचे हे सिनेमेचे तिच्या वेगळ्या कामाची साक्ष देतात. दर्शकांना कोणत्या पद्धतीचे सिनेमे बघायचे असतात हे आता मेघनाच्या चांगलंच लक्षात आलंय. सिनेमातील काही दृश्यं प्रेक्षकांच्या अंगावर काटे उभे करतात तर काही पुन्हा पुन्हा आल्यासारखे वाटू शकतात. 

या सिनेमाचे संवाद अतिका चौहान आणि मेघनानं लिहिलेत... प्रेक्षकांनाही विचार करायला लावण्यासाठी हे संवाद भाग पाडतात. सिनेमाला संगीत दिलंय शंकर - एहसान - लॉय यांनी... 'छपाक'मधला अरिजीत सिंहचा आवाज तुम्हालाही मोहून टाकेन...  

Read More